

पुणे: शहर परिसरात पावसाचे थैमान सुरूच असून शुक्रवारी (दि. 19) काही भागांत पाऊस पडला, तर काही भागांत पावसाचा जोर कमी होता. दरम्यान, शहराच्या अनेक भागास शुक्रवारी पहाटेपर्यंत मुसळधार पावसाने झोडपले. येत्या 20 व 21 सप्टेंबर दरम्यान, शहरात ’यलो अलर्ट’ असून हलका व मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पावसाला अनुकूल असलेला कमी दाबाचा पट्टा, दमट हवामान व वेगाने वाहणारे वारे यामुळे शहरात गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. गुरुवारी (दि.18) दुपारनंतर पावसाने झोडपले होते. रात्रीचा पावसाचा जोर वाढला, त्यानंतर शुक्रवारी (दि. 19) पहाटे अनेक भागांत मुसळधार पाऊस पडला. (Latest Pune News)
सकाळपर्यंत पाषाण येथे 140, शिवाजीनगर 97, कुरवंडे 68.5, लवळे 54.5, चिंचवड 44, हडपसर 37.5, माळिन 29, मगरपट्टा 29, हवेली 20.5, डुडुळगाव 20.5, राजगुरुनगर 7.5, दापोडी 6, बारामती 5.8, निमगिरी 4.5, दौंड 1.5 तर तळेगाव येथे 1 मि.मी पावसाची नोंद झाली.
शहरात सकाळपासून दुपारपर्यंत अनेक भागात ढगाळ हवामान होते. काही भागात उन्हाचे दर्शन झाले. दुपारनंतर कात्रजसह काही भागात पावसाची नोंद झाली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत पुणे येथे 0.1 मि. मी, पाषाण 1, चिंचवड 6 तर लवळे येथे 10.5 मि. मी पावसाची नोंद झाली.