पुणे: ‘मकरंद तू आता नाम फाउंडेशनच्या कामात लक्ष दे, मला आता निवृत्ती हवी आहे. मला लोकांच्या विवंचना जाणून घ्यायच्या आहेत. मी नाटक, सिनेमातूनही 99 टक्के निवृत्ती घेत आहे,’ असे सूतोवाच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी रविवारी पुणे येथे कार्यक्रमातील भाषणात केले.
अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनचा दशकपूर्ती सोहळा पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंचमध्ये रविवारी (दि. 14) पार पडला. या वेळी आपल्या मनातील भावनांना नाना पाटेकर यांनी वाट मोकळी करून दिली. (Latest Pune News)
ते म्हणाले, ‘नाम’ची स्थापना झाली त्या वेळी मुख्यमंत्री निधीपेक्षाही जास्त ओढा ‘नाम’कडे आला. जास्त रक्कम नव्हती; पण ती लोकांनी दिल्याने आमची जबाबदारी वाढली आणि नाम फाउंडेशनचे काम प्रचंड वेगाने विस्तारले. अनेक शेतकरी भेटले. गावातील कामे झाली. आता मला माझ्या मनाप्रमाणे आयुष्य जगायचं आहे. त्यामुळे नाटक, सिनेमातूनही मला निवृत्ती घ्यावी वाटतेय. कधीतरी मला एखादी भूमिका करावी वाटली, तर करेन; पण आता मला गावांत जाऊन लोकांच्या विवंचना समजून घ्यायची इच्छा आहे.
भारताने पाकिस्तानसोबत खेळू नये...
नुकतेच ‘ऑपरेशन सिंदूर’ झाले आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळावा का नाही, हा प्रश्न पत्रकार मला का विचारतात कळत नाही? कारण, मी इथून घरी जायच्या आत तुमच्या बातम्या सुरू होतील अन् नाना असं म्हणाला वगैरे सुरू होईल. पण, तरी मी माझं वैयक्तिक मत सांगतो, खरंतर भारताने पाकिस्तानसमवेत खेळूच नये. माझ्या लोकांचं रक्त सांडलं आहे. मी बोलल्याने हा विषय थांबणार नाही. सरकारचं धोरण यावर असायला हवं, मला माहीत नाही, सरकारचं धोरण काय आहे?
काय म्हणाले नाना...
महाराष्ट्रातील लोकांनी ‘नाम’वर भरभरून प्रेम केले. या संस्थेद्वारे पाणलोटाची अनेक कामे करता आली.
आज अनेक जुने पदाधिकारी, कार्यकर्ते दिसत आहेत. काही जणांना गर्दीची भीती वाटते; पण नाटक, सिनेमात काम करणाऱ्यांनी गर्दीची भीती बाळगू नये.
आमचे अनेक सहकारी आहेत ज्यांनी ‘नाम’साठी अहोरात्र मेहनत घेतली. एक चार्टर्ड अकाउंटंट आहेत, ज्यांनी या संस्थेचे काम करताना पैशांचीअपेक्षा केली नाही.
गडकरी साहेब बोलले की, सरकारच्या मदतीविना कामे करण्याची सवय करा; मात्र मला वाटते अशा सामाजिक कामात सर्वांचा सहभाग असायला हवा.
माझ्यासह मी सांगू इच्छितो की, कार्यक्रमात टाळ्यांची कधी भीक मागू नका.
आम्ही नाटकातली मंडळी, अंधारात सुखं शोधली. आम्ही कधी टाळ्या मागितल्या नाहीत.