पुणे

बारामतीत 2 मार्चला नमो महारोजगार मेळावा : 43 हजार 613 पदांची भरती

Laxman Dhenge

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामतीत दि. 2 मार्च रोजी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात 43 हजार 613 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. परिसरातील अधिकाधिक युवक-युवतींनी यासाठी नावनोंदणी करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी आजवर 311 आस्थापनांनी 43 हजार 613 रिक्त पदे कळविली आहेत. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील युवक-युवतींना रोजगार मिळवून देणार्‍या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित राहणार आहेत.

मेळाव्यामध्ये रोजगार इच्छुक असणार्‍या दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवीप्राप्त उमेदवारांच्या मुलाखती घेत तेथेच त्यांना नियुक्ती दिली जाणार आहे. याकरिता बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, फलटण परिसरातील महाविद्यालयांशी संपर्क करून विद्यार्थ्यांची नावनोंदणी केली जाणार आहे. आजवर 14 हजारांहून अधिक नावनोंदणी झाली आहे. 350 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. पुणे विभागातून येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता त्यांना सोयीसुविधा मिळण्याकरिता नियोजन करण्यात येत आहे. अल्पोपाहार व भोजनव्यवस्था, पिण्याचे पाणी, शौचालय, बैठकव्यवस्था, वैद्यकीय पथक, सीसीटीव्ही, एलईडी डिस्प्ले, जनरेटर, सुरक्षाव्यवस्थेबाबत वारंवार आढावा घेण्यात येत आहे, असे नावडकर यांनी सांगितले.

विविध विकासकामांचे उद्घाटन

बारामती येथे शनिवारी दि. 2 मार्चला परिसरातील विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. बर्‍हाणपूर येथील पोलिस उपमुख्यालय, पोलिस वसाहत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटन, पोलिस विभागाला दुचाकी, चारचाकी वाहनांचे तसेच बारामती बसस्थानकाचे लोकार्पण, सीसीटीव्ही प्रकल्पाचा शुभारंभ आदी कार्यक्रम होणार आहेत. या दोन दिवशी शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासन नियोजन करीत आहे. रोजगार मेळाव्याकरिता येणार्‍या वाहनांनुसार जिल्हानिहाय वाहनतळाची व्यवस्था बारामती शहरात केली जात आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT