मांडवगण फराटा: शिरूर तालुक्यातील नागरगाव (ता. शिरूर) येथे झालेल्या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १३) मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
प्राथमिक माहितीनुसार, निमोणे येथील पवन राजहंस काळे, वंदना पवन काळे, आराध्या पवन काळे आणि बाळासाहेब प्रकाश नागवडे हे चौघे कोल्हापूर येथे मुलाला भेटण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना नागरगाव परिसरात हा अपघात झाला.
या अपघातात पवन काळे, त्यांची मुलगी आराध्या काळे आणि बाळासाहेब प्रकाश नागवडे यांना गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. वंदना पवन काळे या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेची वार्ता समजताच शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.