आयुक्तांच्या बंगल्यावरील साहित्यचोरीची चौकशी करा; महाविकास आघाडीचे महापालिकेसमोर आंदोलन  Pudhari
पुणे

MVA Protest: आयुक्तांच्या बंगल्यावरील साहित्यचोरीची चौकशी करा; महाविकास आघाडीचे महापालिकेसमोर आंदोलन

माजी नगरसेवकांना दिलेल्या वागणुकी विरोधात घोषणाबाजी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात आयुक्त आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या वादानंतर महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस तसेच शिवसेना (ठाकरे) पक्षांनी मनसेच्या समर्थनार्थ गुरूवारी (दि 7) महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले.

यावेळी माजी आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच आयुक्तांना देण्यासाठी आंदोलकांनी प्रतीकात्मक वस्तु देखील आणल्या होत्या. या आंदोलनामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. (Latest Pune News)

पुणे महापालिकेच्या आयुक्तांना भेटण्यासाठी गेलेले मनसेचे पदाधिकारी आणि आयुक्त यांच्यात बुधवारी वाद झाला. या घटनेविरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बाजू घेत पदाधिकार्‍यांना आयुक्तांनी दिलेल्या वागणुकीच्या निषेधार्थ आंदोलन केले. या आंदोलनात चारही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, महापालिकेचे माजी आयुक्त राजेंद्र भोसले यांनीच बंगल्यातील साहित्य लंपास केले आहे. पुणेकरांच्या टॅक्सच्या पैशातून आयुक्तांचा बंगला उभा राहिला असून त्यातील सामानाची चोरी करून घेऊन गेले आहेत.

महापालिका आयुक्तांवर प्रशासनाची जबाबदारी असते, त्याच आयुक्तांनी चोरी केल्याचा प्रकार धक्कादायक आहे. ही चोरी झाकण्यासाठी महापालिका प्रशासन एकवटले आहे. मनसे पदाधिकारी सामान चोरीप्रकरणी निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांना अरेरावी करण्यात आली. नवनियुक्त महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यावर आमचा रोष नाही.

त्यांची दोन महिन्यांपूर्वी नियुक्ती झाली आहे. मात्र, त्यांना चुकीचे मार्गदर्शन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्तांनी पूर्व नगरसेवकांबाबत चुकीची भाषा वापरली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून योग्य ती चौकशी करून कठोर कारवाई करावी, अन्यथा महापालिका भवनाला घेराव घालण्याचा इशारा देखील जगताप यांनी दिला.

काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, लोकप्रतिनिधींसोबत आयुक्तांनी केलेले वर्तन योग्य नाही. सामान चोरी करणार्‍यांवर गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी होती त्यात काहीच चूक नव्हती. मात्र, मनपा आयुक्त त्यांना गुंड म्हणतात, ही आयुक्तांची भाषा असते का? निषेध सभेत अधिकार्‍यांनी या पिलावळींना आताच रोखले पाहिजेे.

मनसे नेते बाबू वागसकर म्हणाले, आयुक्त बंगल्यातील सामानाप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी घेऊन मनसेचे किशोर शिंदे गेले होते. त्यांना आयुक्तांनी दमदाटी केली. या प्रकरणाचा निषेध करण्याची आम्ही एकत्र आलो आहोत. अशा प्रकराचा कुठलाही प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. प्रशासनाची दादागिरी सहन करणार नाही.

मनसेचे ‘इंजिन’ महाविकास आघाडीला

महाविकास आघाडीने मनसेच्या समर्थनार्थ मैदानात उतरत महापालिका प्रशासन आणि महापालिका आयुक्तांच्या विरोधात महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. मनसेने केलेल्या आंदोलनाला पाठींबा देत त्यांच्या मदतीला महाविकास आघाडी धावून आल्याने आता मनसेचे ‘इंजिन’ महाविकास आघाडीला जोडले जाणार का? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT