पुणे : सरकारी नोकरदार असलेल्या मूकबधिर तरुणाने गरीब घरातील मुलीशी लग्नगाठ बांधत तिला उच्चशिक्षित करत सरकारी नोकरी लावली. दोघांनी मिळून संसार उभा करत दोन मुलांना वाढवले. मात्र, सुखी संसाराच्या 20 वर्षांनंतर नात्यात संशय वाढू लागला आणि एकमेकांविरोधातील वाढलेल्या मतभेदांनी त्यांचे आयुष्य वेगवेगळ्या वळणांवर येऊन उभे केले. कौटुंबिक न्यायालयातील चार मध्यस्थी सत्रांनंतरही समेटाचा तो एक धागा पकडता न आल्याने अखेर या दाम्पत्याचा घटस्फोट न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला.
वासू आणि सपना (दोघांचीही नावे बदलेली आहेत). दोघेही मूळचे सोलापूरचे, परंतु सध्या कोंढवा येथे स्थायिक. वासू हा उच्चशिक्षित मूकबधिर तर सपना ही गरीब घरातील. त्याने सपनाशी लग्न करीत तिला उच्च शिक्षण देत सरकारी नोकरी मिळवून दिली. यादरम्यान त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. मुलगा हा पदवीधर असून, मुलगी ही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. लग्नाच्या वीस वर्षांनंतर दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागले. हे वाद इतके विकोपाला गेले की एकत्रित घेतलेल्या सदनिकेचे हप्तेही दोघांनी भरले नाहीत. परिणामी, सदनिका बँकेने जप्त केली. त्यानंतर दोघांनीही एकमेकांविरोधात न्यायालयात खटले दाखल केले. सपना हिने घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार तसेच पोटगी मिळावी म्हणून अर्ज केला, तर वासू याने पत्नीने नांदायला येण्यासाठी अर्ज केला.
मागील तीन वर्षांपासून कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेला वाद पाहता कौटुंबिक न्यायालयातील न्यायधीशांनी हे प्रकरण प्रशिक्षित मध्यस्थ ॲड. ईबाहिम अब्दुल शेख यांच्याकडे मध्यस्थीसाठी पाठविले. त्यांनी चार वेळा मध्यस्थी केली. पत्नी 50 लाख रुपये तर पती 2 लाख पोटगीवर ठाम होते. मध्यस्थीनंतर दोघेही 12 लाख रुपये पोटगी व मुलांचा ताबा पत्नीकडे राहील, यांसह विविध अटी-शर्तीं मंजूर करत एकमेकांवरील गुन्हे मागे घेण्यास तयार झाले. तसेच मुलांना पती भेटेल त्यांना फिरण्यास घेऊन जाईल, फोन करेल ही अट पत्नीने मान्य केली अन् न्यायालयानेही त्यांनी केलेला परस्पर संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज मंजूर करत दोघांचाही मार्ग मोकळा केला.
पती-पत्नीच्या वादात मूकबधिर भावाच्या पाठीमागे मोठा भाऊ खंबीरपणे उभा राहिल्याचे चित्र कौटुंबिक न्यायालयात दिसून आले. लहान भाऊ हातवारे करत होता, तर मोठा भाऊ ते शब्दांद्वारे वकील तसेच न्यायाधीशांपुढे मांडत होता. शब्दांचे सामर्थ्य नसतानाही त्याच्या भावनांचा भार प्रत्येक वेळी मध्यस्थी कक्षासह न्यायालयात जाणवत होता. हा भावनिक क्षण कक्षातील प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होता.
विभक्त होण्याचा निर्णय कोणालाच सोपा नव्हता. मध्यस्थी दरम्यान दोघांनाही पुन्हा एकत्र आणण्यासाठी सतत प्रयत्न झाले. कधी पतीच्या हातवाऱ्यांनी तर कधी पत्नीच्या डोळ्यांतील पाण्याने वातावरण भारावून जात होते. मात्र, जखमा खोल होत्या आणि समेटाचा मार्ग पुन्हा बंद होत होता. चार मध्यस्थींनंतरही मनातील दरी कमी न झाल्याने अखेर दोघांनीही वेगळ्या मार्गाने जगण्याचा निर्णय घेतला.ॲड. ईबाहिम अब्दुल शेख, मध्यस्थ, कौटुंबिक न्यायालय