Mutual Divorce  Pudhari
पुणे

Pune Mutual Consent Divorce: नांदण्यासाठीचा अर्ज समुपदेशनादरम्यान घटस्फोटात परावर्तित, न्यायालयाने प्रतीक्षा कालावधी माफ

पुण्यात न्यायालयाने सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी माफ करून नवदाम्पत्याचा परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर केला

पुढारी वृत्तसेवा

पुणे: हातात हात घालून आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ घेतलेलं जोडपं. पण, अवघ्या तीन महिन्यांत नातं इतकं तडकतं की पुन्हा एकत्र येण्यासाठी केलेला अर्जही शेवटच्याच टप्प्यात बदलतो. पतीने पत्नीला घरी आणण्यासाठी केलेला ‌‘नांदण्यासाठीचा‌’ अर्ज समुपदेशनातच ‌‘घटस्फोटात‌’ बदलला. दोघेही एकत्र येण्याची शक्यता नसल्याने न्यायालयानेही सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी माफ करत या नात्याला अधिकृत पूर्णविराम दिला.

बन्नी आणि नैना (दोघांचीही नावे बदललेली) हे एक नवदाम्पत्य. तो डॉक्टर, तर ती आयटी कंपनीत कामाला. दोघांनीही घरच्यांच्या संमतीने 10 सप्टेंबर 2024 रोजी लग्नगाठ बांधली. घरात आशा, स्वप्नं आणि नव्या सुरुवातीची धावपर्ळें परंतु काहीच दिवसांत मतभेदांचे पहिले पडसाद उमटले आणि 7 डिसेंबर रोजी नैनाने सासर सोडून माहेर गाठले. ती परत येण्यास तयार नसल्याने संसार वाचवण्यासाठी बन्नी याने कौटुंबिक न्यायालयात ‌‘पत्नी नांदायला यावी‌’ असा अर्ज दाखल केला.

त्यानंतर, नैनाही नांदायला तयार असल्याचा अर्ज घेऊन न्यायालयात दाखल झाली. पण जेव्हा समुपदेशकांसमोर त्यांचे तुटलेले संवाद, अपूर्ण अपेक्षा आणि न सांगितलेल्या वेदना पुन्हा उघड्या पडल्या. समुपदेशनावेळी दोघांचेही एका गोष्टीवर एकमत झाले ते म्हणजे ‌‘नातं जबरदस्तीने जिवंत ठेवण्यापेक्षा शांततेने वेगळं होणं योग्य.‌’ यादरम्यान, 8 डिसेंबर रोजी लग्नाचे एक वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर नांदण्यासाठीचा अर्ज परस्पर संमतीच्या घटस्फोटाच्या प्रकरणात परावर्तित करण्यासाठी पतीतर्फे ॲड. अमित राठी आणि ॲड. प्रफुल्ल लुंकड यांनी अर्ज केला.

या वेळी, दोघांच्या वकिलांनी सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी टाळण्याची विनंतीही केली. न्यायालयाने या दोघांच्या परिस्थितीची दखल घेत तो कालावधी माफ केला आणि ‌‘संमतीने‌’ घटस्फोट मंजूर केला. ॲड. राठी आणि ॲड. लुंकड यांनज्ञ ॲड. पूनम मावाणी आणि ॲड. आदित्य जाधव यांनी सहकार्य केले.

लग्नासारख्या नात्यात मतभेद होत असतात, पण काही वेळा ते इतके खोल जातात की जबरदस्तीने एकत्र ठेवणे दोघांच्याही मानसिक आरोग्यास घातक ठरते. या प्रकरणात दोघांनीही शांत मनाने समुपदेशनात आपली भूमिका मांडली आणि परस्पर संमतीने वेगळे होणेच योग्य असल्याचे समजून घेतले. न्यायालयानेही परिस्थितीची संवेदनशीलता ओळखून सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी माफ केला. दोघांनीही सन्मानाने, कोणताही वाद न घालता नात्याचा शेवट ठरवला. हीच या केसची सकारात्मक बाजू आहे.
ॲड. अमित राठी, पतीचे वकील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT