पुणे: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे महापौर असताना एका बांधकाम व्यावसायिकाची मोटार वापरत होते. ही मोटार ना त्यांची स्वतःची होती ना महापालिकेची अधिकृत होती. तर ती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची होती. हा बिल्डर जैन होस्टेल खरेदी प्रकरणाशी संबंधित असून, मोहोळ यांचे व्यावसायिक संबंध या बिल्डरशी असल्याचे देखील आढळते. (Latest Pune News)
या मोटारीचे आणि मालकीचे फोटो पोस्ट करत शिवसेना महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी आरोप केला आहे. यावर मोहोळ यांनी स्पष्टीकरण देत ती मोटार बांधकाम व्यावसायिक यांच्या पार्टनरशिपमधील होती आणि तसे त्यांनी प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले असल्याचे सांगितले. याबाबत धंगेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोहोळांवर आरोप केले आहेत.
धंगेकर म्हणाले, मोहोळ यांचा जैन होस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी गेल्या काही दिवसांत पाहिले आहेत; तरी देखील ते या सर्व गोष्टी योगायोग असल्याचे सांगतात. या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौरपदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होईल, असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले याबाबत जनतेला पूर्णपणे उत्तरे मिळाली पाहिजेत. मोहोळ यांच्या अनेक कृतींकडे मी सुरुवातीला दुर्लक्ष केले. मात्र, जैन मंदिर प्रकरणात जागा चुकीच्या पद्धतीने लाटली गेली, तेव्हा या प्रकरणाची सार्वजनिक चौकशी होणे आवश्यक आहे. तपास यंत्रणांनी हे प्रकरण नीट तपासले पाहिजे, तर पुणेकरांची फसवणूक समोर येईल.
वेताळ टेकडी येथील टनेल, एचसीएमटीआर रस्ता आणि बालभारती ते पौड फाटा लिंक रस्ता या प्रकल्पांना पर्यावरणवाद्यांचा विरोध असतानाही बांधकाम व्यावसायिकांना फायदा व्हावा यासाठी मोहोळ यांनी पुढाकार घेतला, असेही धंगेकर म्हणाले. जर प्रतिज्ञापत्रात बांधकाम व्यावसायिकांसोबत कायदेशीर भागीदारी दाखवत असतील, तर अनधिकृत भागीदारी किती असेल? महापौरपद व केंद्रीय मंत्रिपदाचा गैरवापर करत या कंपनीद्वारे मनी लॉन्ड्रींगचा प्रकार केला गेला आहे, हे लक्षात येते. त्यामुळेच त्यांच्या संपत्तीत तब्बल चारशे पटींनी वाढ झाली असल्याचा आरोपही धंगेकर यांनी केला.
पुण्याचे महापौर असताना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी 2020 मध्ये माझे कायदेशीर बांधकाम दबाव टाकून बंद पाडले. आजही ते बांधकाम बंद पडलेले आहे. त्यांच्यामुळे मला अतोनात नुकसान झाले. जैन समाजाने भाजपला भरभरून मते दिली. मात्र, भाजपचे काही नेते आता कृतघ्न झालेले आहेत. त्यांनी जैन समाजाच्याच पाठीत खंजीर खुपसला असून, याचा धडा त्यांना शिकवावा लागेल.नीलेश नवलखा, बांधकाम व्यावसायिक
स्वतःच्या खर्चाने अडीच वर्षे गाडी वापरली: मोहोळ
याबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘पुण्याचा मी पहिला महापौर आहे, ज्याने महापालिकेची नाही, तर स्वतःच्या खर्चाने अडीच वर्षे गाडी वापरली. ती गाडी बढेकर प्रॉपर्टीजची होती. ही गोष्ट लोकसभेच्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट लिहिलेली आहे. मी त्या कंपनीत पार्टनर आहे आणि त्या पार्टनरशिपमधील गाडी मी वापरली. माझ्या स्वतःच्या मालकीची गाडी मी वापरली, माझे स्वतःचे इंधन मी वापरले. याचा पुणेकरांना अभिमान वाटायला हवा. आता हे शेवटचं स्पष्टीकरण असून, यापुढे मला धंगेकरांबद्दल काहीही बोलायचे नाही. ‘एक वेड लागलेला विकृत मनोवृत्तीचा माणूस रोज काहीतरी बोलतो. मी त्या माणसावर निवडणुकीमध्येही बोललो नाही. तो व्यक्तिगत द्वेष आणि आकस मनात ठेवून बोलत आहे. काहीतरी पोस्ट टाकतो आणि काहीतरी सनसनाटी आहे असे भासवतो, पण हा सगळा बोगस कार्यक्रम सुरू आहे’, असेही सांगितले.