पुणे: ‘ शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून जैन बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. कुणालाही आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी लढावे लागणार नाही. हा विषय सोडवण्यासाठी जी भूमिका घ्यावी लागेल ती घेतली जाईल. आपण जसे सांगाल त्याच पद्धतीने हा विषय एक नोव्हेंबरपर्यंत संपेल! अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंगप्रकरणी शनिवारी दिली. (Latest Pune News)
सेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या (जैन बोर्डिंग) जागेवरून जैन समाजाने काढलेला मोर्चा आणि शिवसेना महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी केलेले आरोप या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी शनिवारी जैन बोर्डिंग येथील मंदिराला भेट दिली व आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज यांचे दर्शन घेतले.
काय म्हणाले मोहोळ...
मी माझी बाजू मांडण्यासाठी इथे आलो. यात माझी काही चूक असती तर मी येथे आलोच नसतो. आदरणीय आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज यांचा संदेश मी व्हिडीओमधून पाहिला, त्यात त्यांनी म्हटले की, ‘तुम्ही खासदार आहात, आमच्या समाजासमवेत उभे राहा.’ आचार्य हे सर्वांना वंदनीय असतात, त्यांच्याशी बोलावे. त्यामुळे त्यांचेच दर्शन घ्यायला मी आलो आहे. ऋ षीमुनींचा आदर ठेवला पाहिजे, मी ते ऐकायला आलो आहे. या सर्व विषयात वेगळे राजकारण झाले. जैन बोर्डिंगचा विषय बाजूला झाला आणि वैयक्तिक राजकारण त्याच्याभोवती अनेक गोष्टी घडत गेल्या. जे काही जैन बांधवांच्या न्यायासाठी अपेक्षित आहे, ते करण्यासाठी महत्त्वाची भूमिका राहील. हा प्रश्न लवकरात लवकर जैन समाजाला हवा तसाच सोडवला जाईल, यासाठी आश्वस्त करतो. या प्रकरणात माझा सहभाग आहे, असे आरोपही झाले. वारंवार मी या विषयाचे स्पष्टीकरण दिले. जैन बांधवांकडून माझे वैयक्तिक नाव घेतले गेले नाही. माझा या विषयाशी कसा संबंध नाही हे मी अनेकदा पुराव्यानिशी मांडले आहे. पण तरी हा विषय थांबला नव्हता, त्यामुळे येथे भेट दिली.
आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज म्हणाले...
विश्वस्त मंदिर विकत असेल तर आम्हाला त्रास होणार नाही का? येथे भगवान अनंत रूपात दिसत आहेत. मात्र, तरीही काल इंच- इंच मोजून पुरावा गोळा करण्यात आला. हे सगळे दुःखदायक आहे. प्राण गेले तरीही जागा सोडणार नाही. या जागेची खरेदी-विक्री रद्द झाली पाहिजे. अन्यथा, एक नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलन आम्ही करू. ही जागा दान दिली असून, तिचा उपयोग शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक कारणांसाठी व्हायला पाहिजे.