पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या विशाल गोखले यांना विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी प्रायव्हेट जेट उपलब्ध करून देण्यात आले. नियमानुसार क्लबकडून व्यावसायिक दरांनुसार शुल्क आकारले गेले असते, तर सुमारे 200 कोटींची एकूण थकबाकी वसूल करणे अपेक्षित होते. परंतु, केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागामुळे हे प्रकरण केवळ 2 कोटी 30 लाख रुपयांमध्ये तडजोड करण्यात आले, असा गंभीर आरोप शिवसेना महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट करून केला आहे. (Latest Pune News)
जैन बोर्डिंग प्रकरणावरून धंगेकर सातत्याने मोहोळ यांच्यावर आरोप करत आहेत. जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा व प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले आहे. मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. तसेच, दि. 27 (सोमवार) पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत पुणेकरांसह जैन बोर्डिंग येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसणार असल्याचेही धंगेकर यांनी सांगितले आहे.
धंगेकर यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत म्हटले आहे की, ’जुहू विमानतळावरून काम करणाऱ्या ‘बॉम्बे फ्लायिंग क्लब’ला फायदा मिळवून देण्यासाठी मोहोळ यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा गैरवापर केला आहे. यामुळे विमानतळ प्राधिकरणाचे सुमारे 197 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मुरलीधर मोहोळ यांचा व्यावसायिक भागीदार अशी ओळख असलेल्या विशाल गोखले यांना विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी ‘बॉम्बे फ्लायिंग क्लब’ने प्रायव्हेट जेट उपलब्ध करून दिल्याचे निदर्शनास आले आहे. नियमानुसार क्लबकडून व्यावसायिक दरांनुसार शुल्क आकारले असते, तर सुमारे 200 कोटींची एकूण थकबाकी वसूल करणे अपेक्षित होते; परंतु, केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागामुळे हे प्रकरण केवळ 2 कोटी 30 लाखांमध्ये तडजोड करण्यात आलेले दिसून येत आहे.
मोहोळ यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा गैरवापर करत ‘बॉम्बे फ्लायिंग क्लब’वर दाखवलेल्या मेहरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचे सुमारे 197 कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या क्लबला याचा फायदा मिळवून दिला, त्याच ’बॉम्बे फ्लायिंग क्लब’ने विशाल गोखले यांच्यासाठी प्रायव्हेट जेट पाठवले होते. यामागे नेमकी कोणत्या प्रकारच्या कामाची दलाली विशाल गोखले यांच्यामार्फत केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी केली आहे, हा तपासाचा विषय आहे. याबाबत मोहोळ यांनीच खुलासा करावा, अशी मागणी धंगेकर यांनी या वेळी केली आहे.