पुणे

पिंपरी : निवृत्त बँक मॅनेजरचा खून करणार्‍यास अटक

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे) : उसने दिलेले पैसे परत करण्याचा तगादा लावल्याने निवृत्त बँक मॅनेजरचा खून करण्यात आला. ही घटना चिंचवड येथे बुधवारी (दि. 19) घडली. याप्रकरणी तिघा जणांना चिंचवड पोलिसांनी शनिवार (दि. 22) अटक केली आहे. रणजित मेलासिंग (70, निवृत्त बँक मॅनेजर, रा. उबाळेनगर, वाघोली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित मेलासिंग यांनी आरोपी नारायण बापूराव इंगळे (46 रा. चिंचवडगाव) याला तीस लाख रुपये उसने दिले होते.

ते परत करण्यासाठी मेलासिंग हे इंगळे याला सतत विचारणा करत होते; मात्र एवढी मोठी रक्कम परत करण्याऐवजी आरोपीने मेलासिंग यांचा काटा काढण्याचे ठरविले. यासाठी आरोपीने त्याचे मित्र राजेश नारायण पवार व समाधान ज्ञानोबा म्हस्के (दोघे रा. चिखली) यांना चार लाख रुपये देऊन मेलासिंग यांच्या खुनाची सुपारी दिली. त्यानुसार मेलासिंग यांना आपण पैसे परत करणार असल्याचे सांगत आरोपीने चिंचवडगावातील घरी बोलावले.

मेलासिंग हे घरी आल्यानंतर त्यांच्या सोबत इंगळे याने बोलण्याचे नाटक केले. त्या वेळी आरोपी नारायण आणि राजेश याने मेलासिंग यांचा दोरीने गळा आवळला आणि समाधान याने चाकूने वार करून भोकसून ठार मारले. नंतर मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून बेडशिटमध्ये बांधून मेलासिंग यांच्या गाडीतून माणगाव एमआयडीसी परिसरात नेला व तेथे त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.

चिंचवड पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्यानुसार, चिंचवड पोलिस ठाणे तसेच गुन्हे शाखा युनिट दोन यांच्या वतीने कारवाई करत आरोपींना अटक केली. तपासाअंती आरोपींनी नारायण इंगळे यांच्या सांगण्यावरून खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT