Pune Crime News
आंतरधर्मीय विवाहाच्या रागामुळे बहिणीच्या पतीचा खून File News
पुणे

Pune Crime News| आंतरधर्मीय विवाहाच्या रागामुळे बहिणीच्या पतीचा खून

पुढारी वृत्तसेवा

आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात ठेवून एका भावाने आपल्या नातेवाइकांच्या मदतीने बहिणीच्या पतीचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून अवशेष नदीपात्रात फेकले. तीन आठवड्यांपूर्वी (१५ जून) घडलेल्या या घटनेचा छडा लावण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले आहे.

ही धक्कादायक घटना भोसरी परिसरातील मोशीमधील औद्योगिक परिसरात घडली होती. याप्रकरणी तीन जणांना अटक केली. अमीर मोहम्मद शेख (वय २५ रा. रांधे, ता. पारनेर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी पंकज विश्वनाथ पाईकराव, गणेश दिनेश गायकवाड, सुशांत गोपाळ गायकवाड, सुनील किसन चक्रनारायण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी पंकज पाईकराव, सुशांत गायकवाड आणि सुनील चक्रनारायण यांना अटक केली आहे. तर गणेश दिनेश गायकवाड हा आरोपी अजूनही फरार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

रांधेतील अमीर शेख आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलीने चार महिन्यांपूर्वी आळंदीत आंतरधर्मीय विवाह केला. त्यानंतर ते मोशीत राहत होते. अमीर खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून आरोपींनी १५ जून रोजी अमीरला दारू पिण्यासाठी बोलवून मोशीतील आदर्शनगरमधून त्यांचे अपहरण केले.

त्यानंतर आरोपींनी अमीर याचा गळा आवळून खून केला आणि त्याचा मृतदेह आळंदी- चाकण रस्त्यावरील निर्जन ठिकाणी नेऊन जाळला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे अवशेष नदीपात्रात फेकले. दरम्यान, अमीरच्या पत्नीने पती बेपत्ता झाल्याची तक्रार भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली होती. अमीरच्या नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी तपास करून खुनाचा उलगडा करून तीन आरोपींना अटक केली आहे.

  • पिंपरी चिंचवडमधील मोशीतील घटना

  • मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT