पालिकेकडे नाहीत मीटर रीडर्स; 83 पैकी तब्बल 59 जागा रिक्त File Photo
पुणे

Municipal Meter Reader Shortage: पालिकेकडे नाहीत मीटर रीडर्स; 83 पैकी तब्बल 59 जागा रिक्त

व्यावसायिक नळजोडधारकांना थेट लाखोंचे बिल

पुढारी वृत्तसेवा

83 Meter Reader Posts 59 Vacant

पुणे: घरगुती नळजोडधारकांना मीटरप्रमाणे पाणी बिल आकारण्याचा प्रस्ताव तयार करणार्‍या पुणे महापालिकेकडेच सध्या पाण्याच्या मीटरचे रीडिंग घेणारे पुरेसे कर्मचारी नसल्याने याचा फटका नागरिकांना बसत आहे.

काही मोजक्या मीटर रीडर्सवर ही जबाबदारी असल्याने याचा परिणाम व्यावसायिक नळजोडधारकांवर झाला आहे. त्यांना दर दोन महिन्यांऐवजी वर्षभराचे एकत्रित बिल पाठविले जात असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. पालिकेकडे मीटर रीडर्सची 83 पदे असून, केवळ 24 मीटर रीडर्स कार्यरत आहेत, तर 59 जागा रिक्त आहेत. (Latest Pune News)

शहरात सध्या घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन प्रकारचे नळजोड दिले जातात. सध्या फक्त व्यावसायिक नळजोडांवरच मीटर बसविण्यात आले आहेत. अशा ग्राहकांना दोन महिन्यांच्या कालावधीनंतर मीटर रीडिंगनुसार बिल पाठवणे अपेक्षित असतांना, मीटर रीडर्सच्या अपुर्‍या संख्येमुळे रीडिंग नियमितपणे घेतले जात नाही. त्यामुळे त्यांना थेट वर्षभराचे बिल एकाच वेळी पाठवले जात आहे.

बावधनमधील डीएसके रानवारा या सोसायटीत सुमारे 500 सदनिका आणि काही दुकाने आहेत. या सोसायटीला दोन निवासी आणि एक व्यावसायिक नळजोड आहे. याअंतर्गत दर दोन महिन्यांनी सुमारे 60 ते 80 हजार रुपयांचे बिल सोसायटीला मिळत होते आणि ते वेळेवर भरले जात होते. मात्र, गेल्या वर्षभरात त्यांना बिलच पाठवले गेले नाही. अलीकडेच त्यांना अचानक 24 लाख रुपयांचे संपूर्ण वर्षाचे पाणी बिल मिळाल्याने सोसायटीचे धाबे दणाणले आहेत.

...म्हणे रीडिंग अचूक नोंदविले जाते

शहराच्या सर्व भागांत समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले असून, या योजनेअंतर्गत शहरात निवासी व व्यावसायिक अशा स्वरूपाचे सुमारे एक लाख 80 हजार मीटर लावण्यात आले आहेत. पूर्वीच्या मेकॅनिकल मीटरऐवजी आता ऑटोमॅटिक रीडिंग मीटर (एआरएम) बसविले जात आहेत. त्यामुळे पाण्याचे रीडिंग स्वयंचलित पद्धतीने व अधिक अचूकपणे नोंदविले जाणार असल्याचा दावा पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकार्‍यांनी केला आहे.

आमच्या व्यावसायिक नळजोडासाठी दर दोन महिन्यांनी येणारे बिल आम्ही नियमित भरत होतो. गेल्या वर्षभरापासून बिलच आले नाही. आता एकदम 24 लाख रुपयांचे पाणी बिल आल्याने आम्हाला धक्का बसला आहे. नियमित बिल आले असते, तर ते भरले गेले असते. मात्र, एकदम 24 लाख रुपयांचे बिल भरायचे कसे? असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यासाठीच आम्ही महापालिकेकडे दाद मागत आहोत.
- माधुरी देशपांडे, डीएसके रानवारा सोसायटी
पाणीपुरवठा विभागात मीटर रीडर्सची कमतरता आहे. ज्या ठिकाणाहून मीटरमध्ये बिघाड असल्याची तक्रार येते, तिथे कर्मचारी पाठवून दुरुस्ती केली जाते. मात्र, बिलामध्ये सवलत देण्याचे अधिकार आम्हाला नाहीत.
- प्रसन्नराघव जोशी, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT