पुणे

करचुकव्यांच्या दारासमोर नगर परिषद वाजवणार बॅण्डबाजा

Laxman Dhenge

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मालमत्ता कर, मिळकत कर आणि पाणीपट्टीची डिसेंबरअखेर एकूण वसुली 12 कोटी 76 लाख रुपये झाली आहे. एकत्रित करवसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी आर्थिक वर्षाच्या उर्वरित तीन महिन्यांत प्रशासनाने कायदेशीर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या थकबाकीदारांच्या नावांची यादी वर्तमानपत्रात जाहीर करणे, थकबाकीदारांच्या घरांसमोर, व्यवसायाच्या ठिकाणी ढोलबाजा पथके वाजवून थकित करभरणा करण्यासाठी आवाहन करणे, जप्ती वॉरंट बजावणे, मालमत्ता सीलबंद करणे आणि अनधिकृत नळजोडधारकांनी दंडाची रक्कम न भरल्यास त्यांचे नळजोड कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी शुक्रवारी (दि. 22) सांगितले.

थकबाकीदारांवर कडक कारवाईचा इशारा

नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीकडे मोठी थकबाकी

तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सर्वांत मोठी थकबाकीदार असून कंपनीची एकूण थकबाकी तब्बल 10 कोटी 72 लाख 83 हजार 225 रुपये आहे. नगर परिषदेच्या एकूण मालमत्ता कराच्या मागणीपैकी सुमारे 47 टक्के थकबाकी या एकट्या कंपनीकडे आहे. निवडणुकीची संधी मतदानापूर्वी साधून वॉर्डातील उमेदवारालाच पाच वर्षांच्या टॅक्सची थकबाकी भरायला लावणा-या प्रवृत्तींची संख्याही लक्षणीय आहे. निवडणूक लांबल्याने यंदा सात वर्षांच्या टॅक्सचा बोजा पडेल, असे एका माजी नगरसेवकाने नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर सांगितले.

मार्चअखेर शंभर टक्के करवसुलीसाठी नियोजन केले आहे. आतापर्यंत सुमारे 13 कोटींची वसुली झाली असून, उर्वरित 29 कोटी रुपयांची थकबाकी मार्चअखेर वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. व्याज आणि दंडाचा भार टाळायचा असेल तर थकबाकीदार नागरिक, व्यावसायिकांनी करभरणा वेळेत केला पाहिजे.
– एन. के. पाटील, मुख्याधिकारी

10 कोटी 72 लाखांची वसुली

  • नगर परिषद करसंकलन विभागप्रमुख कल्याणी लाडे यांच्याशी संपर्क साधला असता मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराचे मागणी उद्दिष्ट 32 कोटी 95 लाख 60 हजार आहे. त्यापैकी 10 कोटी 72 लाख चार हजार वसूल झाले आहेत. डिसेंबरअखेर मालमत्ता कराची सुमारे 31 टक्के वसुली झाली असून, सुमारे 23 कोटी रुपयांची थकबाकी आहे. पाणीपट्टी कर भरणा मागणी उद्दिष्ट 9 कोटी 40 लाखांचे असून, त्यापैकी 2 कोटी 40 लाख रुपयांचा कर नळजोडधारकांनी भरला आहे. पाणीपट्टी करापोटी सुमारे 27 टक्के वसुली झाली असून 6 कोटी 64 लाख रुपयांचा कर नागरिकांनी अद्याप भरलेला नाही. मिळकत कराची वसुली 29 टक्के झाली आहे. 99 लाख 11 हजार रुपयांची मागणी मालमत्ता करापोटी असून, त्यापैकी केवळ 28 लाख 95 हजार रुपये जमा झाले आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT