पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून केल्या जाणार्या विविध प्रकारच्या दंडाची रक्कम आता ऑनलाइन भरता येणार आहे. त्यासाठी एका खासगी बँकेच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, बँकेशी करार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
महापालिकेकडून विविध प्रकारची कारवाई करून दंड आकारला जातो. त्यासाठीचे दंड निश्चित केलेले असून, ती वसूल करताना रोख रक्कम घेतली जाते. तसेच, संबंधित व्यक्तीस छापील पावती दिली जाते.
मात्र, अनेकदा अशा प्रकारची बनावट पुस्तके वापरून केवळ कागदी पावती दिली जाते. तर, अनेकदा पावती बिलांमध्ये फेरफार करून दंडाची रक्कम भरली जात नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. परिणामी, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता थेट या विभागांकडून आकारला जाणारा दंड ऑनलाइन स्वीकारण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात आरोग्य विभाग, घनकचरा, अतिक्रमण नियंत्रण, आकाशचिन्ह, तसेच मंडई विभागाच्या दंडासाठी ही सुविधा दिली जाणार आहे. तसेच, परवाना शुल्कही याच प्रणालीद्वारे स्वीकारले जाणार आहे. जवळपास दीड महिन्यापूर्वी पालिका प्रशासनाने याबाबत अंतिम निर्णय घेतला आहे. मात्र, कोणत्या विभागाने बँकेशी करार करायचा, यावरून वाद सुरू आहेत. हा निर्णय घेतला तेव्हा केवळ मोजक्याच विभागांना बैठकीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र, विभाग प्रमुखांनी ही जबाबदारी एकमेकांवर झटकत करारनामा करण्यास दिरंगाई चालवली आहे.
हेही वाचा