पुणे : राज्यातील महापालिका निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला लागल्यानंतर लगेचच राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 ते 19 डिसेंबर यादरम्यान होणार आहे. या कालावधीत कोणत्याही नव्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे महापालिका निवडणुका आता आणखी काही काळ लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.(Latest Pune News)
नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, तर मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. त्यानंतर राज्य प्रशासनाचे लक्ष थेट हिवाळी अधिवेशनाकडे वळणार आहे. अधिवेशनाच्या काळात निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्याची प्रथा नसल्याने, महापालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक आता अधिवेशनानंतरच म्हणजेच 19 डिसेंबरनंतरच जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आयोगावर वेळेचा ताण असला तरी अधिवेशन, कर्मचारी यंत्रणेवरील दबाव आणि निवडणूक कार्यक्रमांच्या ओव्हरलॅपमुळे आयोगाकडून न्यायालयाकडे मुदतवाढ मागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या राज्यातील 14 महापालिका आणि 250 हून अधिक नगरपालिका-नगरपंचायतींच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. स्थानिक सत्तांतर आणि बदलत्या राजकीय समीकरणांमुळे या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, आता अधिवेशनामुळे महापालिका निवडणुकीचा बिगुल पुन्हा काही काळासाठी लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.