नितीन वाबळे
मुंढवा: शहर आणि उपनगरांच्या परिसरात खासगी बांधकामे तसेच रस्त्यांच्या कामात अडथळा ठरणारी झाडे वेळोवेळी तोडली जातात. तोडलेल्या वृक्षांच्या वयोमानानुसार पुन्हा किती झाडांची लागवड करायची, हे महापालिकेकडून निश्चित केले जाते व पुढील एक महिन्यामध्ये तोडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करावे लागते. मात्र, झाडांचे रोपण करण्यासाठी महापालिकेला तसेच खासगी प्लॉटधारकाला पुरेशी जागा मिळत नसल्याने या झाडांचे नियमानुसार पुनर्रोपण केले जाते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बांधकाम व्यावसायिकांकडून बांधकाम प्रकल्पांना अडथळा ठरणारी तसेच महापालिका प्रशासनाकडूनही रस्तारुंदीकरण, उड्डाणपूल, ड्रेनेजलाइन, पावसाळी वाहिनी आदी कामांना अडथळा ठरणारी झाडे तोडली जातात. महापालिकेच्या नियमानुसार तोडलेल्या झाडांचे एक महिन्याच्या आत पुनर्रोपण करावे लागते. (Latest Pune News)
पुनर्रोपण करावयाची झाडे सहा फुटांपेक्षा मोठी असावी लागतात. यासाठी जागाही मुबलक लागते. महापालिका प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्या विविध ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागांवर झाडांचे पुनर्रोपण होऊ शकते. मात्र, यासाठी महापालिका प्रशासनाकडून धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक आहे. महापालिकेकडून असे धोरणात्मक निर्णय होत नसल्याने पुणे शहराचे पर्यावरणाचे संतुलन ढासळण्याचा धोका निर्माण झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
महापालिका अधिकार्यांकडे याविषयी विचारणा केली असता विकासकामांसाठी तोडलेल्या झाडांची उद्याने तसेच ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल तेथे पुनर्रोपण केले जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, एखाद्या वैयक्तिक मालकीच्या प्लॉटवरील झाडे तोडल्यानंतर त्याचे पुनर्रोपण नियमाप्रमाणे झाले आहे की नाही तसेच पुनर्रोपण केलेली झाडी वाढली झाली आहे की नाही, याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही.
झाडे लावण्यासाठी जागेचा शोध सुरू
हडपसर औद्योगिक वसाहतीच्या पाठीमागून मगरपट्टा सिटीच्या पाठीमागील रस्त्याला जोडणार्या कालव्यावरील पुलाच्या बाजूची काही झाडे रस्तारुंदीकरणाच्या कामासाठी गेल्या दोन महिन्यांपूर्वी तोडण्यात आली आहेत. त्या बदल्यात महापालिकेला 6 फूट उंचीच्या 481 झाडांचे पुनर्रोपण करावयाचे आहे. मात्र, यासाठी अद्याप जागा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे ही झाडे लावण्यासाठी जागेचा शोध सध्या महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे.
महापालिकेने ज्या ठिकाणी रस्तारुंदीकरण केले आहे. त्याच्या बाजूला आम्ही झाडे लावण्याचे निश्चित केले आहे. आगामी काळात आम्ही त्या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहोत. महापालिकेच्या उद्यान आणि वन विभागाकडून ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी वृक्षारोपण केले जाते.- अनिल सोनवणे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग, महापालिका