बिबवेवाडी: राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वाढदिवसाचे बॅनर, फ्लेक्स, जाहिरातीचे कटआऊट, तसेच खासगी क्लासच्या (शिकवणीचे) छोट्या जाहिरातीचे बोर्ड, बांधकाम व्यावसायिकांचे लहान, मोठ्या जाहिरातीचे बोर्ड विद्युत पोलवर उंचीवर बांधून ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे विविध प्रकारची उन्हाळी शिबिरे इ.च्या जाहिरातींचे बोर्ड, फ्लेक्सवर महापालिकेच्या अतिक्रमण व आकाशचिन्ह विभागाकडून कारवाईचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.(Latest Pune News)
मार्केट यार्ड भागातील शिवनेरी पथावरील भाजी मार्केट मुख्य प्रवेशद्वाराजवळील भाग ते सातारा रस्त्यावरील भागापर्यंत फ्लेक्ससाठी बांधलेले लाकडी सांगाडे किती दिवस ठेवणार आहात, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत, याकडे आकाशचिन्ह विभाग का कारवाई करत नाही. महापालिकेचे संबंधित अधिकारी,कर्मचारी या बाबत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत आहेत.सुट्टीच्या दिवशी फोन घेत नाहीत तर..कामाच्या दिवशी साईट वर आहे असे उत्तर देऊन वेळ मारून नेतात.
जाहिरातदाराकडून पत्रकारांना धमकी
फ्लेक्स, बोर्ड, कमानीबाबत बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाशचिन्ह विभाग अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित जाहिरात दाराकडून पत्रकारांवर दबाव आणून धमकी दिली. बातमीसाठी प्रतिक्रिया देणार नाही, अशी उर्मट भाषा वापरण्यात आली.
बिबवेवाडी परिसरात अनेक ठिकाणी व्यावसायिकांचे फ्लेक्स बोर्ड, जाहिराती दिवसेंदिवस वाढत आहेत. ठरावीक बोर्ड, जाहिरातीवर कधी तरी महापालिकेची कारवाई होते. पण, अनेक बोर्ड, फ्लेक्सवर महिनोन् महिने कारवाई केली जात नाही, आकाशचिन्ह विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.- आनंद राजहंस, स्थानिक रहिवासी, अप्पर पुणे.