

बारामती: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक मतदानाची प्रशासनाने तयारी केली आहे. मतदानाच्या तयारीसाठी शनिवारी (दि. 17) दुपारी सर्व पथके मतदान केंद्रांवर पोहचली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
रविवारी (दि. 18) सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान होणार आहे. या मतदानासाठी एकूण 76 मतदान केंद्र आहेत. मतदारांनी मतदानाला येताना निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड, फोटो असलेले बँक पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा ओळख पटविण्यासाठी सोबत आणावा. मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी 10 झोनल अधिकार्यांचे पथक नेमण्यात आले आहे. या पथकासमवेत एक पोलिस अधिकारी आणि एका पोलिस जवानाचा समावेश आहे.(Latest Pune News)
याबाबत सहायक निबंधक प्रमोद दुर्गुडे म्हणाले, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी एकूण 76 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रत्येक केंद्रावर 1 केंद्र अध्यक्ष, 5 मतदान अधिकारी, 2 कर्मचार्यांसह आठ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण 200 मतदान अधिकारी आणि कर्मचार्यांची या प्रक्रियेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
’अ’ वर्गासाठी 21 हजार 782 ऊस उत्पादक सभासद, तर ’ब’ वर्गासाठी 324 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर, सोमवारी (दि. 19) बारामती शहरातील अभियांत्रिकी भवन येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
या निवडणुकीसाठी एकूण 200 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये 1 उपविभागीय पोलिस अधिकारी, 25 अधिकारी आणि इतर पोलिस कर्मचार्यांचा समावेश आहे.
- डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी