Murder Case Pudhari
पुणे

Pune Crime: मुंढवा झेड कॉर्नर येथे अनोळखी तरुणाचा खून; परिसरात खळबळ

दगडाने डोक्यात हल्ला करून हत्या झाल्याचा संशय; मुंढवा परिसरात 15 दिवसांत तिसरी घटना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मुंढवा परिसरातील झेड कॉर्नर येथे शनिवारी सकाळी (दि. 16) एका अनोळखी तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. दगडाने डोक्यात हल्ला करून त्याचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत 15 दिवसांत झालेली खुनाची ही तिसरी घटना आहे.

शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला जखमी अवस्थेत झेड कॉर्नर परिसरात एक तरुण पडला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुंढवा पोलिस ठाण्यातील अधिकारी व तपास पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी केली असता संबंधित तरुण गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आढळून आला. त्याच्या डोक्यावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळावरून एक मोबाईल फोन जप्त केला असून, त्यामध्ये

कोणतेही सिम कार्ड नसल्याचे आढळून आले. तसेच मोबाईलचा डिस्प्ले बंद अवस्थेत असल्याने त्यातील माहिती तत्काळ मिळू शकली नाही. पोलिसांकडून मोबाईलच्या ईएमआय क्रमांकाच्या आधारे मृत तरुणाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू होते. रात्री उशिरापर्यंत संबंधित तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

मुंढवा परिसरात यापूर्वीही झाले दोन खून

मुंढवा परिसरात यापूर्वीही दोन खुनाच्या घटना घडल्या असून, या सलग घटनांमुळे परिसरात गुन्हेगारी वाढल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ब्युटीपार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून करण्यात आला होता. आफरीन सलीम पठाण (वय 29) असे त्या तरुणीचे नाव होते. केशवनगर परिसरातील कचरा डेपोजवळ तिचा मृतदेह आढळला होता.

सुरुवातीला अपघाताचा संशय व्यक्त झाला असला तरी शवविच्छेदन अहवालात गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या प्रकरणात गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली. तसेच, दारू पिताना झालेल्या वादातून मित्राने डोक्यात दगड घालून खून केल्याची आणखी एक घटना याच परिसरात घडली होती. लोकेश मानसिंग ठोंबरे (वय 30) असे मृताचे नाव असून, या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT