Holi Stage Accident Pudhari
पुणे

Mundhwa Holi Stage Accident: मुंढवा येथील ‘कलर कल्चर’ कार्यक्रमात लोखंडी खांब कोसळला; चार जण जखमी

रॉयल पाम्समध्ये होळी जल्लोषादरम्यान अपघात; सुरक्षेच्या बाबींवर पोलिसांची चौकशी सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मुंढवा परिसरातील रॉयल पाम्स येथे होळी व धुलवडीनिमित्त आयोजित ‌‘कलर कल्चर‌’ कार्यक्रमादरम्यान स्टेजवरील आडवा लोखंडी खांब अचानक कोसळल्याने चार जण किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली.

होळीच्या जल्लोषासाठी मोठ्‌‍या संख्येने नागरिक कार्यक्रमस्थळी जमले होते. डीजेच्या तालावर रंगांची उधळण सुरू असतानाच स्टेजजवळ उभारण्यात आलेला लाइटिंगचा आडवा लोखंडी खांब अचानक खाली कोसळला. हा खांब थेट समोर उभ्या असलेल्या काही जणांवर पडल्याने एकच गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, खांब कोसळण्याची घटना इतकी अचानक घडली की उपस्थितांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. काही जण खाली पडले, तर काहींना डोक्याला व हातापायांना दुखापत झाली. या घटनेनंतर जखमींना रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात हलवले.

घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी इतर अधिकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रमासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, तसेच स्टेज व लाइटिंगची संरचना सुरक्षितपणे उभारण्यात आली होती का, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, लोखंडी खांब योग्यरीत्या मजबुतीकरण न केल्याने किंवा गर्दी व मोठ्या आवाजामुळे निर्माण झालेल्या कंपामुळे तो कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT