मुंढवा: मुंढवा येथील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या प्रमुख दोन रस्त्यांची पावसामुळे सध्या दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, रेल्वे प्रवासी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
रेल्वे स्टेशन ते मुंढवा गाव व ताडीगुत्ता चौक या दोन्ही रस्त्यांवर दररोज शेकडो प्रवासी आणि नागरिकांची वर्दळ असते. मात्र, पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावरील खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि विशेषतः पादचाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी या दोन्ही रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. रेल्वे स्टेशनकडे जाणारे हे दोन्ही महत्त्वाचे मार्ग असूनही महापालिकेकडून त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. अखेर या रस्त्याचे काम कधी होणार? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
मुंढवा येथील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. पाऊस पडल्याने या रस्त्यावर खड्डे पडले आहेत व रस्ता निसरडा झाला आहे. महापालिका प्रशासनाने या रस्त्यांचे रुंदीकरण करून या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावणे आवश्यक आहे.अभिनव परदेशी, रहिवासी, मुंढवा