पुणे: विवाहित महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयातून झालेल्या वादात चौघांनी एका तरुणावर धारधार शस्त्राने वार करून, त्याला झाडाला टांगून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. याबाबत प्रवीण धनंजय माने (वय 24, रा. श्रीमाननगर, शेवाळेवाडी फाटा, मांजरी) यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. प्रवीण माने हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
तर महेश सोमनाथ सरोदे (वय 35) त्याचे साथीदार आदित्य शरद भोसले (वय 22), आदित्य संजय रोकडे (वय 21), कैलास संतोष ओव्हाळ (वय 26, रा. सर्व भीमनगर मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मुंढवा येथील भीमनगरमधील बारामती ॲग््राो चिकन सेंटरसमोर 19 जानेवारी रोजी मध्यरात्री 1 वाजता घडली.
याबाबत मुंढवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी सांगितले की, प्रवीण माने आणि महेश सरोदे हे दोघेही ड्रायव्हर म्हणून काम करतात. प्रवीण माने यांचे एका विवाहित तरुणीबरोबर प्रेमसंबंध आहेत. त्यावरून महेश सरोदे याने मनात राग धरून प्रवीण माने याला फोन करून भीमनगर येथे बोलावून घेतले.
प्रवीण माने हा तेथे आल्यावर महेश सरोदे व त्याच्या साथीदारांनी त्यांच्या डोक्यात, उजव्या गुडघ्यावर, दोन्ही हातावर, पाठीवर धारधार हत्याराने वार केले. त्यांचे कपडे पेटवून दिले. तसेच ’तू पोलिसांकडे तक्रार दिली तर तुझी गेम वाजवू,’ अशी धमकी देऊन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलिस आयुक्त अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक, सहायक पोलिस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी घटनास्थळाला भेट दिली.
मुंढवा पोलिसांनी प्रथम महेश सरोदे याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून त्याच्या इतर तीन साथीदारांना अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक गणेश पिंगुवाले तपास करीत आहेत.
प्रेमसंबंधातून हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चार आरोपींना पोलिसानी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.स्मिता वासनिक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा