पुणे

मुळशीत मुरूम, मातीची अवैध वाहतूक सुसाट : तलाठी, मंडलाधिकारी यांचे दुर्लक्ष

Laxman Dhenge

पौड : पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यातील अनेक गावांतून दररोज शेकडो ट्रक मुरूम आणि मातीची अवैध वाहतूक सुरू आहे. या गावातील तलाठी व मंडलाधिकारी यांचे या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. माले येथील हिवाळी वस्ती, नांदिवली-शेडाणी, शेरे, मांदेडे, हाडशी, भादस या भागांतून दररोज शेकडो ट्रक माती व मुरूम जात आहे. प्रथम ही वाहतूक फक्त रात्री व्हायची. मात्र, मातीला असलेल्या मागणीमुळे आता ही वाहतूक दिवसाही जोरात सुरू आहे.

माले येथील हिवाळी वस्ती हा भाग इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असतानाही या ठिकाणी जागा सपाटीकरणाच्या नावाखाली अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. आपले राजकीय किंवा गुन्हेगारी वजन वापरून डोंगर कोठेही उकरून फुकट मिळणार्‍या मातीपासून काही जण दररोज लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. त्यांची पार्श्वभूमी बघून स्थानिक नागरिक याला विरोध करू शकत नाहीत. तसेच तलाठी, मंडलाधिकारी आणि पोलिस यांच्याबरोबर असलेल्या अर्थपूर्ण मैत्रीमुळे कोणीही माती वाहतुकीला विरोध करताना दिसून येत नाही.

मुठा घाटातील अपघातानंतर मुळशीत तस्करांचा मोर्चा

मुळशी तालुक्यातील मुठा भागातूनही अनेक ट्रक अवैध मातीची वाहतूक व्हायची. मात्र, मुठा घाटात डंपरच्या धडकेत पिरंगुट येथील युवकाचा मृत्यू झाला. या वेळी पिरंगुट ग्रामस्थ आक्रमक झाले होते. तेव्हापासून मुठा भागातील माती व मुरूम वाहतूक बंद झाली. तेव्हापासून या माती वाहतूक करणार्‍यांनी आपला मोर्चा मुळशी भागात वळविला.

मुळशीची माती थेट लोणी काळभोरला

मुळशी तालुक्यात असलेली लाल माती ही चांगली दर्जाची असल्याने तिला चांगली मागणी आहे. ही माती हिंजवडी, वाघोली, उरुळी कांचन आणि लोणी काळभोरपर्यंत जाते. वीटभट्टीचालक तसेच नर्सरीधारकांकडून या मातीला मोठी मागणी आहे.

मुख्य रस्त्याने वाहतूक

माले, कोळवण, भादस भागातून जाणारे मातीचे डंपर हे पुणे ते दिघीबंदर या महामार्गाने जात. तसेच काही वाहतूक ही दारवली-अंबडवेटमार्गेही होत असते. मुख्य मार्गाने वेगाने भरलेले डंपर धावत असतात; मात्र यावर कोठेही कारवाई होताना दिसून येत नाही.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT