Rahul Kul Pudhari
पुणे

Rahul Kul: मुळशी धरणातील पाणी मुळा-मुठा आणि भीमा नदीत सोडा; राहुल कुल यांची मागणी

वीजनिर्मितीसाठीचा पाण्याचा विसर्ग कमी करण्याची मागणी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि पुणे व सोलापूर जिल्ह्यांत जाणवणारी तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता, मुळशी धरणातील वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करून ते पाणी मुळा-मुठा व भीमा नदीत सोडण्यात यावे, अशी मागणी दौंडचे आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने बैठक घेण्याची विनंती केली आहे.

यंदा राज्यात सर्वदूर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुणे व सोलापूर जिल्ह्यांनाही त्याची तीव्र झळ बसत आहे. मुळा-मुठा व भीमा नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असून, जनावरांचा चारा व पिण्याचा प्रश्नही अत्यंत गंभीर बनला आहे. मुळशी धरणातील पाणी प्रामुख्याने वीजनिर्मितीसाठी वापरले जाते आणि ते पाणी पश्चिमेकडे वाहून जात असल्याने पूर्वेकडील दुष्काळग्रस्त भागाला त्याचा कोणताही लाभ होत नाही, असे निरीक्षण आमदार कुल यांनी नोंदवले आहे.

वीजनिर्मितीसाठीचा वापर कमी करून हे पाणी मुळा-मुठा व भीमा नदीत सोडल्यास नदीकाठच्या गावांचा पिण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच दौंड तालुक्यासह पुणे व सोलापूर जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळणार असून उजनी धरणातील साठ्यात भर पडून सोलापूर जिल्ह्यालाही मोठा दिलासा मिळणार आहे.

या उपायामुळे पशुधन, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि परिसरातील उद्योगांनाही मोठा आधार मिळणार असल्याचे आमदार कुल यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT