पुणे: शहराची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता जलसंपदा विभागाने मुळशी धरणातून मिळणाऱ्या पाण्यातून दोन्ही महापालिका आणि पीएमआरडीएकडून किती पाणी घेतले जाईल, याबाबत निश्चित सूत्र ठरलेले नाही. याबाबत तिन्ही संस्थांकडून प्रतिसाद न मिळाल्याने जलसंपदा विभागाला पुढील आराखडा करण्यास बिलंब होत आहे. पाणीवाटपाचे सूत्र ठरल्याशिवाय खर्चाची जबाबदारी निश्चित करता येत नसल्याने आराखड्यासही विलंब होत आहे. त्यामुळे या हक्काच्या पाण्यासाठी पुणेकरांना वाट पाहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आवश्यक असलेले अतिरिक्त पाणी खडकवासला प्रकल्पातून घेणे अपुरे पडत आहे. त्यासाठी मुळशी धरणातून वाया जाणारे पाणी बिगरसिंचनासाठी वापरता येईल, असा पर्याय पुढे आला होता. त्यानुसार मुळशी धरणातून वाया जाणार्या सुमारे सात टीएमसी पाण्याच्या वापरास जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे. याचा सविस्तर प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
या प्रस्तावाला राज्य सरकारने तसेच टाटा कंपनीने तत्त्वतः मान्यता दिली आहे. हे पाणी नेमके कधी, कसे व कोठे वापरायचे, यासंदर्भात अभ्यासगट स्थापन करावा, अशा सूचना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार टाटा कंपनी आणि जलसंपदा विभागाच्या तज्ज्ञ अधिकार्यांचा एक अभ्यास गट तयार करण्यात आला असून, यासंदर्भात शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करण्यात येत आहे.
हे पाणी या तिन्ही संस्थांच्या अखत्यारीत असलेल्या कार्यक्षेत्रात वाटप करण्यात येणार असल्याने याबाबत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुढाकार घेण्यास सांगितले. पुलकुंडवार यांनी त्यानंतर जलसंपदा विभागासह पुणे व पिंपरी महापालिका तसेच पीएमआरडीएसोबत एका बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, पुलकुंडवार यांची आता बदली झाल्याने याबाबत कुणी पुढाकार घ्यावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, या तिन्ही संस्थांनी किती पाणी लागेल, याचा आराखडा जलसंपदा विभागाला देणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी येणारा खर्च हा तिन्ही संस्थांच्या पाणीवाटपावर ठरणार आहे.
...असे मिळेल पाणी
मुळशी प्रकल्पाचा एकूण जिवंत पाणीसाठा १८.४७ टीएमसी इतका आहे, तर मृत साठा ८.१२ टीएमसी इतका आहे. या पाण्यातून तीनशे मेगावॅट वीजनिर्मिती करण्यासाठी सहा संच वापरण्यात येत आहेत. वीजनिर्मितीव्यतिरिक्त १.६५ टीएमसी बोगदा प्रकल्पासाठी व उर्वरित ९.८५ टीएमसीपैकी बाष्पीभवन वजा जाता शिल्लक सात टीएमसी पाणी पूर्वेकडे अर्थात शहरासाठी वळवता येणार आहे.