मुळशीत भातशेती धोक्यात; शेतकरी हवालदिल Pudhari
पुणे

Mulshi Crop: मुळशीत भातशेती धोक्यात; शेतकरी हवालदिल

पावसाने ओल्या दुष्काळाच्या झळा

पुढारी वृत्तसेवा

पौड: सततच्या पावसामुळे मुळशी तालुक्यात भातशेती धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, 60 ते 70 टक्के भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ओल्या दुष्काळाच्या झळांनी शेतकर्‍यांचे कंबरडे मोडणार, हे नक्की.

यावर्षी मान्सूनने वेगळा पवित्रा घेत एक महिना आधीच पाऊस पडायला सुरुवात झाली. त्यामुळे मे महिन्याच्या मध्यातच पाऊस सुरू झाला व मेअखेर सुरू होणारी भातपेरणी रखडली. भातपेरणी करायला शेत वाफशावर न गेल्याने भातपेरणी होऊ शकली नाही. ज्यांनी भातपेरणी केली ती सततच्या पावसामुळे पाण्यात भिजून, वाहून गेल्याने धोक्यात आली आहे. काही ठिकाणी भाताचे बेणे कुजून गेले आहे. थोडीफार भातपेरणी फक्त उगवत आहे. (Latest Pune News)

पावसाने उघडीप दिली नाही, तर भातशेतीचे भयंकर नुकसान होणार आहे. त्यामुळे ओल्या दुष्काळाचे सावट शेतकर्‍यांना नुकसानकारक ठरणार आहे. भातशेतीचे उत्पादन यंदा निम्म्याहून अधिक घटेल, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. शेत वाफशावर नसून पाण्यात बुडाल्याने अनेक शेतकर्‍यांची भातपेरणी राहिली आहे.

कोरडवाहू शेती असलेल्या शेतकर्‍यांवर ओल्या दुष्काळाच्या झळांनी अस्मानी संकट ओढवले आहे. मुळशी तालुक्यातील कोरडवाहू शेतकरी मुख्यत्वे भात पीक घेतात. भात शेतीच धोक्यात आल्याने शेतकर्‍यांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुळशी धरण परिसर, कोळवण खोरे, रिहे खोरे, मुठा खोरे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भात शेती होते. या सर्व खोर्‍यातील नागरिकांना भात शेतीचाच मुख्य आधार आहे. हा भाग सोडला तर मुळशीच्या इतर पट्ट्यांत बागायती शेती देखील आहे. ओल्या दुष्काळाच्या झळांमुळे कोरडवाहू आणि बागायती दोन्ही शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे.

तांदळाच्या किमती विक्रमी होणार?

भात शेती अशीच धोक्यात राहिली तर तांदळाच्या किमती यावर्षी सर्व विक्रम मोडून उच्चांकी राहणार आहेत. तांदळाच्या किमती गगनाला भिडणार्‍या ठरू शकणार्‍या असतील, तर त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांवर होणार आहे. सर्वसामान्य लोकांचे बजेट यामुळे बिघडणार असून, तांदळाचा पुरवठा अपुरा पडणार आहे. ही सगळी शक्यता वर्तविली जात असून, पावसाने उघडीप द्यावी, अशी शेतकरी मनोमन प्रार्थना करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT