मोहसीन शेख
बाणेर: पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सुरू असलेल्या 'नदी सुधार प्रकल्पा'च्या कामांचा परिणाम आता पुणे शहरातील बाणेर-बालेवाडी परिसरावर होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या दोन ते तीन दिवसांच्या पावसानंतर बाणेर स्मशानभूमी, प्रथमेश पार्क आणि ज्युपिटर हॉस्पिटल परिसरात मुळा नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला.
मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग केला नसतानाही या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील पिंपळे निलख व वाकड परिसरात नदी सुधार प्रकल्पांतर्गत नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे नदीचे नैसर्गिक पात्र अरुंद झाले असून, पावसाचे पाणी पूर्वीप्रमाणे वेगाने पुढे जाऊ शकत नाही.
परिणामी, पाण्याचा दाब वाढून त्याचा परिणाम उताराच्या दिशेला असलेल्या बाणेर आणि बालेवाडी परिसरावर होत आहे. अतिवृष्टीनंतर निवासी भागांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. याविषयी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
पर्यावरणीय अभ्यासावर प्रश्नचिन्ह
नदी सुधार प्रकल्प राबविताना पर्यावरणीय परिणाम, नदीचा नैसर्गिक प्रवाह आणि पूरनियंत्रण यांचा पुरेसा अभ्यास करण्यात आला होता का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. नदीपात्रात करण्यात आलेल्या मानवनिर्मित बदलांमुळे भविष्यात अधिक गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
राजकीय नेत्यांची चुप्पी?
या प्रकल्पाविरोधात काही महिन्यांपूर्वी स्थानिक नागरिकांनी आंदोलने केली होती. पहिल्या एक-दोन आंदोलनांच्या वेळी काही भाजप पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि खासदारांनी घटनास्थळी भेट पाहणी केली होती. मात्र, त्यानंतरच्या आंदोलनांकडे राजकीय नेत्यांनी लक्ष दिले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिक आमदारांनीही या विषयावर भूमिका स्पष्ट केली नाही. अलीकडील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतरही लोकप्रतिनिधींनी मौन बाळगल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
पिंपळे निलख परिसरात नदी सुधार योजनेअंतर्गत नदीपात्रात टाकण्यात आलेल्या भरावामुळे त्याचा फटका आता बाणेर-बालेवाडी परिसराला बसत आहे. ही नैसर्गिक नव्हे, तर मानवनिर्मित आपत्ती आहे. अवघ्या दोन दिवसांच्या पावसात परिसरात पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून आवश्यक सुधारणा कराव्यात; अन्यथा भविष्यात हजारो नागरिकांना त्याचा गंभीर फटका बसू शकतो.अमर लोंढे, रहिवासी, बाणेर