पुणे: मुळा-मुठा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेकडून गेल्या तीन वर्षांत सुमारे ७४९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असला, तरी शहरातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यापैकी निम्म्याहून अधिक सांडपाणी आजही कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. शहरातील सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था अद्याप अपुरी असल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न पूर्वीइतकाच गंभीर असल्याचे महापालिकेच्या सभागृहात सादर करण्यात आलेल्या लेखी उत्तरातून स्पष्ट झाले आहे.
नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महापालिकेच्या मलनिःसारण विभागाने सांगितले, की शहरात दररोज सुमारे ९८० दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाणी निर्माण होते. मात्र, उपलब्ध प्रकल्पांद्वारे केवळ ४७७ एमएलडी सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जाते. परिणामी, तब्बल ५०३ एमएलडी सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न होता नदी अथवा इतर जलवाहिन्यांमध्ये मिसळत आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, मुळा-मुठा नदीमध्ये थेट मिसळणाऱ्या प्रमुख नाल्यांची आणि ओढ्यांची संख्या आजही २२ इतकी आहे. नदी प्रदूषणाचा हा मुख्य स्रोत अद्याप पूर्णपणे बंद करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. दरम्यान, नदी स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रणासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींची संख्या, तसेच त्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील अद्याप संकलित करण्यात येत असून, तो नंतर सादर केला जाईल, असेही महापालिकेने आपल्या उत्तरात नमूद केले आहे.
नदीस्वच्छता मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह
नदी प्रदूषणाची परिस्थिती बदलण्यासाठी महापालिकेकडून ३९६ एमएलडी क्षमतेची ११ नवीन सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पाची सुमारे ८४ टक्के कामे पूर्ण झाली असून, गेल्या तीन वर्षांत त्यावर ७३०.१६ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.
याशिवाय, रामटेकडी येथे १० एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पासाठी १३ कोटी रुपये, तर केशवनगर-मुंढवा येथे १२ एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पासाठी ५.८७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अशा प्रकारे नदी प्रदूषण नियंत्रणासाठी एकूण सुमारे ७४९ कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च झाला आहे. मात्र, एवढ्या मोठ्या आर्थिक गुंतवणुकीनंतरही शहरातील जवळपास निम्मे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत जात असल्याने नदी स्वच्छता मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.