ST Pudhari
पुणे

MSRTC NCMC Card Mandatory: एसटी सवलतींसाठी आता एनसीएमसी कार्ड अनिवार्य; महिलां- ज्येष्ठांना मोठा बदल

बारामती आगारात कार्ड वितरणास सुरुवात; कार्ड नसल्यास पूर्ण तिकीट दर भरावा लागणार

पुढारी वृत्तसेवा

बारामती: राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) योजनांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. महिला व 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी तिकीट सवलत आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) शिवाय मिळणार नाही. त्यामुळे संबंधित प्रवाशांनी तातडीने एनसीएमसी कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन बारामती आगाराचे प्रमुख रविराज घोगरे यांनी केले आहे.

डिजिटल व्यवहाराला चालना देत सवलतींची अचूक नोंद ठेवण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. बारामती आगारात शुक्रवार (दि. 20)पासून एनसीएमसी कार्ड वितरणास सुरुवात झाली. यापूर्वी आधार कार्ड किंवा जन्मतारखेचा पुरावा दाखवून सवलत दिली जात होती. मात्र, नव्या नियमांनुसार ते पुरेसे ठरणार नाही. कार्ड नसल्यास प्रवाशांना पूर्ण तिकीट दर द्यावे लागणार आहे.

राज्यात 26 ऑगस्ट 2022 पासून काही प्रवर्गांसाठी मोफत प्रवास योजना सुरू झाली. त्यानंतर 17 मार्च 2023पासून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत लागू करण्यात आली. ग््राामीण व शहरी भागातील लाखो महिलांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या योजनांचा लाभ घेतला. मात्र, सवलतींची अचूक आकडेवारी, महसुलातील तफावत आणि शासनाकडून मिळणाऱ्या परतफेडीतील विलंब लक्षात घेता डिजिटल प्रणालीची गरज निर्माण झाली होती.

या पार्श्वभूमीवर एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. हे कार्ड ओळखपत्रासोबतच प्री-पेड वॉलेटप्रमाणे कार्य करेल. नवीन कार्डासाठी 199 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. जुने स्मार्ट कार्ड परत केल्यास 149 रुपयांत कार्ड मिळेल. कार्डमध्ये किमान 100 रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. 50 रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येणार आहे. सर्व व्यवहार रोखविरहित पद्धतीने नोंदविले जातील. एसटी आर्थिक अडचणीत असताना सवलतींचा अचूक हिशेब ठेवणे गरजेचे आहे. डिजिटल कार्डमुळे गैरवापराला आळा बसेल आणि उत्पन्न-खर्चाचा ताळेबंद स्पष्ट होईल.

सध्या बारामती आगार तसेच निरा बसस्थानक येथे कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अचूक पत्ता असल्यास 15 दिवसांत कार्ड घरपोच मिळणार आहे. ग््राामीण भागात टप्प्याटप्प्याने सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
रविराज घोगरे, आगारप्रमुख, बारामती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT