‘रिंगरोड’साठी एमएसआरडीसीचा ‘मास्टर प्लॅन’; काम रखडल्यास कंपन्यांना दिवसाला एक लाख दंड Pudhari
पुणे

Pune: 'रिंगरोड'साठी एमएसआरडीसीचा ‘मास्टर प्लॅन’; काम रखडल्यास कंपन्यांना दिवसाला एक लाख दंड

अडीच वर्षात रिंगरोडवर धावणार गाड्या

पुढारी वृत्तसेवा

दिगंबर दराडे

पुणे: पुण्याकरिता महत्त्वाकांक्षी असलेल्या रिंगरोड प्रकल्पासाठी जमीन संपादन पूर्ण झाले आहे. ज्यामुळे शहरी हद्दीतील वाहनांचा ताण लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसीने मास्टर प्लॅन तयार केला आहे. अवघ्या अडीच वर्षात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. काम रखडल्यास कंपन्यांना मोठा दंड म्हणजे दिवसाला लाख रुपये ठोठावण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकार्‍यांनी सांगितले की, कायदेशीर मंजुरीच्या तारखेपासून अडीच वर्षे किंवा 30 महिन्यांच्या आत बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. (Latest Pune News)

वॉररूम इनिशिएटिव्ह म्हणून व्यवस्थापित केलेला हा प्रकल्प पुणे महानगर प्रदेशासाठी एक मोठा पायाभूत विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. कोणताही विलंब न करता 30 महिन्यांत पूर्ण केला जाईल, असे एमएसआरडीसीच्या अधिकार्‍यांनी ’पुढारी’ शी बोलताना सांगितले.

अधिकार्‍याने सांगितले की, जमीन सपाट करणे, नद्या आणि ओढ्यांवर पूल बांधणे आणि माती भरणे, यासारख्या कामांना सध्या सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळ्यात काही कामे तात्पुरती स्थगित होऊ शकतात.

परंतु, बहुतेक काम वेळापत्रकानुसार पुढे जाईल. एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम विभागासाठी आवश्यक असलेल्या सुमारे 99 टक्के आणि पूर्व विभागासाठी 98 टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. म्हणजेच, सुमारे 1,740 हेक्टर जमीन ताब्यात आली आहे. जर कंत्राटदारांनी निर्धारित मुदतीत पूर्ण करता आला नाही, तर सरकारी नियमांनुसार दंड आकारला जाईल.

1) प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी वेळेवर काम सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. विभागांमधील समन्वय प्रयत्नांद्वारे, प्रशासनाने किचकट वाटाघाटी आणि कायदेशीर मंजुरी यशस्वीरीत्या पार पाडल्या. यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे. राज्य रस्तेविकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) प्रस्तावित वर्तुळाकार रस्त्याचे

(रिंगरोड) काम सुरू करण्यात आले आहे. निविदा प्रक्रिया राबवून निवड करण्यात आलेल्या कंपन्यांना अडीच वर्षांत काम पूर्ण करण्याच्या उद्दिष्टानुसार कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्यामुळे संबंधित नऊ कंपन्यांनी वाडेबोल्हाई, खडकवासला, सिंहगड, मुळशी, उर्से, चाकण, हिंजवडी, सोरतापवाडी या ठिकाणी एकत्रितपणे प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली आहे

2) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाकडून 172 किलोमीटर लांब आणि 110 मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत.

त्यासाठी सुमारे 42 हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 42 हजार 711 कोटी रुपयांच्या सुधारित प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार पूर्व भागात सात आणि पश्चिम भागात पाच टप्पे आहेत.

‘राज्य सरकारच्या आदेशानुसार संबंधित नऊ कंपन्यांना तातडीने कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. अडीच वर्षे वा त्याच्या आत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट नऊ कंपन्यांना दिले आहे. त्यामुळे तातडीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. प्राथमिक स्तरावर पावसाळ्याच्या दृष्टीने डोंगराळ भागातील सपाटीकरण, नदी-नाल्यांवरील पूल, भरावाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. पावसाळा सुरू झाल्यावर इतर कामे सुरू होतील.
- राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, रस्ते महामंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT