Raju Khatale MPSC Success Story Pudhari
पुणे

MPSC Success Story: दुसऱ्या प्रयत्नात क्रॅक केली MPSC; राजू खताळेची सहाय्यक नगर रचनाकार पदी निवड

MPSC Success Story: राजू खताळेने MPSC परीक्षेत सहाय्यक नगर रचनाकार पदासाठी 14 वी रँक मिळवत यश संपादन केलं. पहिल्या अपयशानंतर त्याने दीड वर्ष सातत्याने अभ्यास करून दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं.

पुढारी वृत्तसेवा

Raju Khatale MPSC Success Story: स्पर्धा परीक्षांचा प्रवास हा कधीच सरळ नसतो. त्यात चढ-उतार असतात, अपयश येतं, मन खचतं… पण जो माणूस त्या सगळ्यावर मात करून पुन्हा उभा राहतो, तोच शेवटी यश मिळवतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत सहाय्यक नगर रचनाकार (Assistant Town Planner), गट-ब पदासाठी 14 वी रँक मिळवणाऱ्या राजू खताळेची कहाणी याच उत्तम उदाहरण आहे.

राजूचा प्रवास सोपा नव्हता. त्याने 2022 मध्ये या परीक्षेसाठी तयारी केली होती. अभ्यास केला, मेहनत घेतली… पण तरीही त्याला अपयश आलं. एका अपयशाने अनेकांना निराशा येते, काहीजण प्रयत्न सोडून देतात. पण राजूने तसं केलं नाही. त्याने अपयशाला स्वीकारलं आणि त्यातून शिकत पुन्हा नव्याने उभं राहण्याचा निर्णय घेतला.

तो सांगतो, “ज्या दिवशी या पदाची जाहिरात आली, त्याच दिवसापासून मी अभ्यासाला सुरुवात केली.” ही सुरुवात फक्त अभ्यासाची नव्हती, तर स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची होती.

राजूने पुढील काही वर्ष पूर्णपणे अभ्यासाला वाहून घेतलं. या काळात त्याने स्वतःवरही काम केलं. मोबाईलपासून दूर राहणं, सोशल मीडियापासून अंतर ठेवणं आणि अभ्यासात सातत्य ठेवणं, हे त्याने पाळलं. कारण त्याला माहीत होतं की, स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी फक्त अभ्यास पुरेसा नसतो, तर शिस्त आणि सातत्यही तितकंच महत्त्वाचं असतं.

या प्रवासात त्याला मित्र आणि शिक्षकांचं खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं. वेळोवेळी त्यांनी त्याला योग्य दिशा दाखवली. जेव्हा कधी अभ्यासात अडचणी आल्या किंवा मन खचलं, तेव्हा त्यांनी त्याला पुन्हा उभं केलं. आणि याचबरोबर, त्याच्या आई-वडिलांचा आधारही त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. त्यांच्या पाठिंब्यामुळेच राजूने हा दीर्घ आणि कठीण प्रवास पूर्ण केला.

राजूची ही यशोगाथा सांगते की, प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवतं आणि पुढच्या प्रयत्नासाठी तयार करतं. आज राजू खताळेने 14 वी रँक मिळवत सहाय्यक नगर रचनाकार पद मिळवलं आहे. पण त्याच्या या यशामागे पाच वर्षांची मेहनत, सातत्य आणि त्याग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT