पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या तत्कालीन परिवहन आयुक्तपदाच्या काळातील कथित घोटाळे आणि गैरव्यवहारांची पोलखोल करत आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या तातडीच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
भीमनवार यांनी नैतिकतेच्या आधारावर त्वरित राजीनामा द्यावा, अन्यथा गणेशोत्सवाच्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पवारांनी दिला आहे.
रोहित पवार यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत भीमनवार यांच्या कार्यकाळातील विविध तक्रारी आणि हजारो कोटींच्या कथित कंत्राट वाटपाचे पुरावे सादर केले. चाणक्यांचा संदर्भ देत ते म्हणाले, “राजाचे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याचे चारित्र्य संशयास्पद असेल, तर त्यांनी पदावर राहू नये.”
भीमनवार यांनी यापूर्वी पेपरफुटी प्रकरणात पुरावे मागितले होते; त्या पार्श्वभूमीवर पवारांनी हे पुरावे सार्वजनिक केले आहेत. एमपीएससी ही स्वायत्त संस्था असल्याने अध्यक्षांना थेट हटवणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असले, तरी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
भीमनवार हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्यानेच सरकार त्यांच्यावरील गंभीर तक्रारींची चौकशी न करता त्यांना पाठीशी घालत आहे का? असा थेट प्रश्नही या वेळी उपस्थित केला. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेल्या या संवेदनशील पदावर तुकाराम मुंढे यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची गरज आहे.
दरम्यान, ११ सप्टेंबरपर्यंत राजीनामा न आल्यास गणपती प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांच्या साथीने आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असेही रोहित पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.