पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय हरित लवादाने आदेश देऊनही महापालिकेचा बाणेर येथील कचरा प्रकल्प सुरू असून, तो बंद करून अन्य जागी स्थलांतरित करावा, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पुण्यातील कचरा प्रकल्प बंद करण्यासाठी थेट मावळच्या खासदारांनी पुढाकार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
संबंधित बातम्या :
बाणेर येथे महापालिकेने सात वर्षांपूर्वी नोबेल एक्स्चेंज एन्व्हॉयर्मेंट सोल्युशन कंपनीचा कचरा प्रकल्प उभारलाआहे. मात्र, या प्रकल्पाला येथील सोसायटीधारक रहिवासी नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. रहिवाशांनी थेट राष्ट्रीय हरित लवादामध्ये (एनजीटी) तक्रार केली होती. त्यावर एनजीटीने हा प्रकल्प बंद करून अन्य जागी स्थलांतरित करण्याचे आदेश महापालिकेला दिलेले आहेत. मात्र, हा प्रकल्प स्थलांतरित करण्यासाठी पालिकेला अद्याप जागा मिळालेली नाही. त्यामुळे पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प न चालविता तो पन्नास टक्के क्षमतेने चालविला जात आहे. असे असतानाच मावळचे खासदार बारणे यांनी बाणेरच्या या प्रकल्पासंदर्भात पालिकेविरोधात थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यात त्यांनी न्यायालयाने हा प्रकल्प बंद करून तो अन्य जागी स्थलांतरित करण्याचे आदेश दिलेले असतानाही पालिकेने अद्याप हा प्रकल्प बंद केलेला नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत आहे. येथील रहिवासी नागरिकांना या प्रकल्पाने त्रास होत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार हा प्रकल्प तातडीने बंद करण्याचे आदेश पालिकेला द्यावेत, अशी मागणी बारणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
उच्च शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघात प्रकल्प
बाणेर येथील हा कचरा प्रकल्प उच्च व तत्रंशिक्षणमंत्री चद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात आहे. या प्रकल्पाला सर्वच राजकीय लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला होता. आता एकाच सरकारमध्ये असलेल्या खासदार बारणे यांनी थेट मंत्री पाटील यांच्या मतदारसंघातील प्रकल्पात लक्ष घातल्याने आश्चर्य व्यक्त केले.