प्रदूषण करणार्या 17 प्रकल्पांना नोटीस
गत पाच वर्षांच्या तुलनेत 2025 मध्ये सर्वाधिक कारवाया
काही ग्रामपंचायतींनाही ‘कारणे दाखवा’
सांडपाणी आणि नदी प्रदूषणात मोठी कारवाई
पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अॅक्शन मोडवर आले असून, गत पाच वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक कारवाया झाल्या आहेत. शहर आणि परिसरात वायू, जलप्रदूषण करणार्या कंपन्यांच्या विरोधात या कारवाया करण्यात आल्या आहेत. यात काही मोठ्या उद्योगांनाही जल आणि वायुप्रदूषण केल्याच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. पुणे-पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनादेखील या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. (Pune Latest News)
शहरात कोरोना काळात प्रदूषण खूप कमी झालेले दिसले. कारण, त्या काळात सर्वच व्यवहार ठप्प होते. त्यानंतर मात्र सर्व काही पूर्वपदावर येताच जल आणि वायूप्रदूषणही झपाट्याने वाढले. तसेच, वाहनप्रदूषणही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरात फार कमी वेळ शुद्ध हवा पुणेकरांना घेत येत असल्याची सद्य:स्थिती आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कारवाईचा धडाका सुरू केला यात सर्वाधिक कारवाई ही रेडी मिक्स काँक्रीट कारखान्यांवर केली आहे.
यात शहर आणि परिसरातील प्लांटचा समावेश आहे. यात ताथवडे, नांदे, मारुंजी येथील कारखान्यांना ते बंद करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. तर काहींना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत. मार्च 2025 पर्यंत 11 कारखान्यांना बंद, तर 17 कारखान्यांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत.
धुळीचे नियंत्रण न करणे
पाण्याच्या स्प्रिंकलरची सोय नाही
अयोग्य बार कोडिंग
धूलिकण 2.5 आणि 10 पीएमची पातळी खूप मोठ्या प्रमाणात वाढली
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 20 पैकी 18 रेडी मिक्स काखान्यांना उत्पादन थांबविण्याचे आदेश देण्यात आले.
चार प्रकल्पांवर अंतरिम कारवाई सुरू असून, त्यांना बँक गॅरंटी मागण्यात आली आहे. तर काही कारखान्यांचा वीज आणि पाणीपुरठा खंडित करण्यात आला आहे.
पुणे परिसरातील तळेगाव, मावळ, वारजे, गुलटेकडी अशा पाचपेक्षा जास्त ऑटोमोटिव्हशी संबंधित कंपन्यांना (उत्पादन आणि सेवा, वाहनदुरुस्ती, सुटे भाग) हवा आणि जलप्रदूषण उल्लंघनांच्या संदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
ऑगस्ट 2024 : चाकण येथील काही मोठ्या कार असेंब्ली प्लांटमधील तपासणीत प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याचे उघड झाले.
एमपीसीबीने त्यांच्या प्रादेशिक अधिकार्यामार्फत सुधारात्मक कारवाईचे निर्देश दिले आहेत.
मार्च 2024 : देहूगाव येथील एका फॅबि—केशन कारखान्याला हवा आणि ध्वनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली. रहिवाशांच्या तक्रारींवरून ही चौकशी करण्यात आली होती.
ऑक्टोबर- नोव्हेंबर 2024 : एमपीसीबीने वडगाव शेरी येथील एका खासगी विकसकाला आणि धायरीमधील सिमेंट एमएनसी तर बावधनमधील विकसकाला कारवाईचे अंतरिम निर्देश जारी केले.
मार्च ते जून 2025 : यादरम्यान इंद्रायणी नदीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडल्याबद्दल काही ग्रामपंचायतींविरुद्ध 14.36 कोटी रुपयांच्या पर्यावरणीय नुकसानभरपाईची शिफारस केली होती. याबाबत मे 2025 मध्ये हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) मध्ये एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. तसेच, मे 2025 मध्ये इंद्रायणी नदीतील विषारी फोम आणि प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर एमपीसीबीने सुधाराणात्मक उपाययोजना प्रस्तावित केल्या. यात एसटीपी अपग्रेड करणे अशा योजनांचा समावेश आहे.
मी नुकताच पंधरा दिवसांपूर्वी पुणे येथील विभागाचा पदभार घेतला आहे. या झालेल्या कारवायांबाबत मी इतकेच सांगेन, की या ज्या काही कारवाया झाल्या आहेत, ज्यांना कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.- बाळासाहेब कुकडे, उपविभागीय अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे.