Pune Crime News
शिरूर: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसरा चांगला नवरा मिळेल म्हणून दुसऱ्या लग्नाच्या हव्यासापोटी एका निर्दयी मातेने आपल्या ११ महिन्यांच्या चिमुकल्याचे डोके सिमेंटच्या ओट्यावर आपटून निर्घृण खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिने बाळाचा मृतदेह बॅगेत भरून विहिरीत फेकून दिला.
रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पूजा रवींद्र पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मातेचे नाव आहे. याप्रकरणी वडील रवींद्र अशोक पवार यांनी रांजणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवार कुटुंब कोकण-मुरुड येथून फिरून आल्यानंतर ११ महिन्यांचा चिमुकला यश सतत रडत असे.
या किरकिरीला कंटाळलेली पूजा ही दुसऱ्या लग्नाचा विचार करत होती. "कुठेतरी लांब निघून जाऊन दुसरा चांगला नवरा शोधून लग्न करावे; मात्र सोबत मुलगा असेल तर कोणी लग्न करणार नाही," अशा विकृत विचाराने तिने पोटच्या बाळाचा काटा काढण्याचे ठरवले.
निर्दयी पूजाने बाळाचे डोके सिमेंटच्या ओट्यावर आपटून त्याचा खून केला. त्यानंतर कोणाला समजू नये, म्हणून तिने यशचा मृतदेह एका बॅगेत भरला आणि घराजवळच असलेल्या शेतातील विहिरीत फेकून दिला.