पुणे

पुणे : भाजी मंडई ओस अन् विक्रेते रस्त्यांवर !

अमृता चौगुले

पुणे : टीम पुढारी : महापालिकेने उपनगरांच्या परिसरात विविध ठिकाणी भाजी मंडई उभारल्या आहेत. मात्र, या ठिकाणी ग्राहक फिरकत नसल्याचे सांगत विक्रेत्यांनी रस्त्यांवर आपली दुकाने थाटल्याने बहुतांशी मंडई ओस पडल्या आहेत. यामुळे विविध रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असून, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. दैनिक 'पुढारी'ने भाजी मंडईच्या सद्यस्थितीचा घेतलेला हा आढावा…

कात्रज  : रस्त्यावर व्यवसाय थाटल्याने वाहतूक कोंडी

कात्रज चौकात भाजी मंडईबाहेर रस्त्यावर पथारीधारकांची अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत आहेत. पर्यायी जागा उपलब्ध करूनही ते रस्त्यावर बसण्याचा हट्ट सोडायला तयार नसल्याने परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. अतिक्रमण कारवाईला न जुमानता राजकीय वरदहस्तामुळे या व्यावसायिकांचा रस्त्यावर व्यवसाय सुरू आहे. त्यांच्या मनमानीमुळे वाहतुकी कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

कात्रज चौकात भाजी, फळ विक्रेते, कापड विक्रेते, खाद्य पदार्थ विक्रेत्यांची अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. कात्रज चौक परिसरात 114 अधिकृत पथारीधारक असून, अनधिकृत पथारीधारकांची संख्यादेखील मोठी आहे. मुख्य रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जुन्या बसस्थानक शेजारी 12 जानेवारी 2022 रोजी राजमाता जिजाऊ भाजी मार्केट उभारण्यात येऊन 57 अधिकृत पथारीवाले यांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी व्यवसाय होत नसल्याचे कारण पुढे काही विक्रेते संतोषनगरकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर बसत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या समस्येची दखल घ्यावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.

कात्रज चौक, संतोषनगर मुख्य रस्त्यावर अवैधरीत्या पथारीधारक बसतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली असून, लवकर कारवाई केली जाईल. तसेच पुनर्वसन ठिकाणी आरोग्य विभागाच्या जागेची मागणी केली असून, 114 पथारीधारकांचे पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू आहेत. -सुरेखा भणगे, सहायक आयुक्त

वडगाव बुद्रुक : मंडई : असून अडचण नसून खोळंबा ! 
सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथील शाळेसमोरील मुख्य चौकात बसणार्‍या पथारी व्यावसायिकांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. या त्रासातून नागरिकांची सुटका होण्यासाठी येथील भाजी मंडईचे स्थलांतरित करून कालव्यालगत वडगाव फाट्यापर्यंत पत्राशेड उभारून भाजी विक्रेत्यांना बसण्याची व्यवस्था (हॉकर झोन) करण्यात अली. मात्र, या मंडईकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या ठिकाणी भाजी विक्रेत्यांसह 98 पथारी व्यावसायिकांना गाळे देण्यात आले. दरम्यान, ग्राहक या भाजी मंडईकडे फिरकत नाहीत. त्यामुळे विक्रेत्यांनी भाजी मंडईजवळ असलेल्या रस्त्यावर आपली दुकाने थाटली. यामुळे 'असून अडचण नसून खोळंबा' अशी या मंडईची अवस्था झाली आहे. दरम्यान, फन टाईम थिएटर रस्ता, नवीन ई-लर्निंग शाळेसमोरील रस्ता, गावाकडे जाणारा रस्ता, तसेच क्षेत्रीय कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यांवर शेकडो भाजी व इतर साहित्यांची विक्री करणार्‍यांनी आपली दुकाने थाटली आहेत. यामुळे परिसरात संध्याकाळी वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावर बसणार्‍या व्यावसायिकांनी आपल्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करावा, अशी मागणी होत आहे.
माजी नगरसेवक हरिदास चरवड म्हणाले की, नवीन जागा असल्यामुळे भाजी विक्रेत्यांचा या ठिकाणी व्यवसाय होत नाही. यामुळे महापालिकेने भाजी विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात पदपथावर व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

कोंढवा : शांताई भाजी मंडईत ग्राहक येईनात !

अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळे कोंढवा परिसरातील रस्त्यांवर अनधिकृत भाजीपाला विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे शांताई भाजी मंडईत ग्राहक फिरकत नसल्याने ती ओस पडली आहे. परिणामी, तेथील विक्रत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोंढवा खुर्द येथे 1992 साली महापालिका प्रशासनाने शांताई भाजी मंडई बांधली आहे. या मंडईत एकूण 72 गाळे असून, इतर लहान 20 गाळे आहेत. कोंढवा परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने ही भाजी मंडई सोयीस्कर होती. मात्र, अलीकडच्या काही वर्षांमध्ये कोंढवा गावठाण, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, मिठानगर, साईबाबानगर आदी भागांत अनधिकृत भाजी विक्रेत्यांचे संख्या वाढली आहे. याचाच फटका शांताई भाजी मंडईला बसला असून, ग्राहकच मंडईकडे फिरकत नाहीत. यामुळे या मंडईत नेहमीच शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनधिकृत हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून, नागरिकांना रस्त्यावरून चालणे अवघड होऊन बसले आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

धनकवडी : मुख्य रस्त्यावरच भाजी घ्या, भाजी !
धनकवडी, आंबेगाव पठार, बालाजीनगर, भारती विद्यापीठ परिसरामध्ये विविध ठिकाणच्या मुख्य चौकात आणि रस्त्यांच्या दुतर्फा भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. यामुळे परिसरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. धनकवडी गाव 1997 मध्ये महापालिकेमध्ये समाविष्ट झाले असले, तरी या ठिकाणी अद्यापी भाजी मंडईची पुरेशी सुविधा नसल्याने गैरसोय होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. बालाजीनगरमधील एलोरा पॅलेससमोरील रस्ता ते जिजामाता चौक ते पवार हॉस्पिटल, आंबेगाव पठारमधील सूर्या चौक ते तीन बत्ती चौक, त्रिमूर्ती चौक ते महाराणा प्रताप चौक परिसरातील रस्त्यांवर भाजी विक्रेते अनधिकृतपणे व्यवसाय करीत आहेत. धनकवडी गावठाण परिसरातील शेवटच्या बसथांब्याजवळील रस्त्यावरदेखील भाजी विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे पदपथ पादचार्‍यांसाठी की भाजी विक्रेत्यांसाठी, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. धनकवडी गावठाण येथील भाजी विक्रेत्यांनी परिसरात भाजी मंडईची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. सहायक आयुक्त सुरेखा भणगे म्हणाल्या की,धनकवडी परिसरातील आरक्षित जागेवर भाजी मंडईची सुविधा उपलब्ध करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. त्या ठिकाणी अधिकृत भाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यात केले जाईल.

येरवडा : भाजी मंडई भरते रस्त्यावर

येरवड्यातील सर्वांत जुनी असणारी सौ. शीला साळवे भाजी मंडईतील गाळे ओस पडले आहेत. सर्व भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर शेड उभारून तिथे आपला व्यवसाय थाटला आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.
या भाजी मंडईच्या बहुमजली इमारतीचे नियोजन गेल्या काळात माजी नगरसेवकांनी केले. मात्र, याला विक्रेत्यांनी विरोध केल्यामुळे मंडईची इमारत रखडली आहे. आता मंडईतील गाळ्यांत जुने भाजी विक्रेते बसत नाहीत. त्यांनी मुख्य रस्त्यावर ठाण मांडले आहे. यामुळे नवी खडकी तसेच राज चौकाकडे जाणार्‍या वाहतुकीस अडथळा होत आहे. भाजी मंडईचा परवाना असलेले विक्रेते आणि पथारी व्यावसायिकांचा परवाना असलेले व्यावसायिक रस्त्यावर बसत असल्यामुळे काश्मीर कॉलनी ते भाटनगर चौक तसेच दुसर्‍या रस्त्यावर गावळी वाड्यापर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. मंडई निरीक्षक मोहन बागुल म्हणाले की, परिसरातील 80 टक्के व्यावसायिकांना महापालिकेने परवाने दिले आहेत. त्यामुळे ते रस्त्यावर व्यवसाय करत असल्याने मंडईतील विक्रेतेदेखील बाहेर आले आहेत. अतिक्रमणांबाबत मंडईतील व्यावसायिकांना नोटीस दिल्या आहेत. मंडई विभाग आणि अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई करणे अपेक्षित आहे.

पौड रोड : पौड रोडला मंडईची प्रतीक्षा

पौड रोड भागात महापालिकेची भाजी मंडई नसल्यामुळे भाजी व फळ विक्रीची दुकाने रस्त्यावर थाटली जात आहेत. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. महापालिका प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या ठिकाणी भाजी मंडई उभारणार तरी कधी, असा सवाल पथारी व्यावसायिक व नागरिकांकडून उपस्थित होत आहे. पौड रोड परिसरात भाजी विक्रेत्यांनी अनेक रस्त्यांवर दुकाने थाटली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. असेच चित्र वनाज कॉर्नर, किनारा हॉटेल, जयभवानीनगर, किष्किंदानगर, राजमाता जिजाऊनगर (सुतारदरा), शिक्षक नगर, भुसारी कॉलनी परिसरात दिसून येत आहे. महापालिकेने पौड रोड परिसरात अद्याप भाजी मंडई उभारली नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT