अष्टापूरसह नदीकाठच्या गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव; कायमस्वरूपी उपायांची गरज  Pudhari
पुणे

अष्टापूरसह नदीकाठच्या गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव; कायमस्वरूपी उपायांची गरज

ग्रामपंचायतींकडून धुरफवारणीचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव मूळ: अष्टापूर (ता. हवेली) परिसरात मुळा-मुठा नदीतील वाढत्या जलपर्णांमुळे नदीकाठच्या गावांमध्ये सध्या डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेने ही समस्या आणखीनच गंभीर होत आहे. या त्रासामुळे गावकर्‍यांमध्ये ताप, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका वाढला असून, आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.

डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामपंचायतींनी धुरफवारणी करुन नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, ही तात्पुरती उपाययोजना ठरत आहे. ही समस्या कायमस्वरूपी सुटणार कधी असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. (Latest Pune News)

अष्टापूरसह हिंगणगाव, कोरेगाव मुळ, भवरापूर, बिवरी, टिळेकर वाडी आदी नदीकाठावरील गावांमध्ये डासांची उत्पत्ती जास्त प्रमाणात होते. यामध्ये जलपर्णीचा फैलाव, साचलेले पाणी, गटारींची सफाई न होणे ही मुख्य कारणे असून, ही समस्या वर्षानुवर्षे सुरू आहे.

डासांचा प्रादुर्भाव फक्त वैयक्तिक त्रासापुरता न राहता तो संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर परिणाम करणारा ठरतो. त्यामुळे स्थानिक पातळीवर तातडीने उपाययोजना राबवणे आणि जिल्हा प्रशासनाकडून त्याला पूरक ठोस कृती अपेक्षित आहे. ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना शासनाने आर्थिक आणि तांत्रिक मदतीचा हातभार लावल्यासच ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागू शकते, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

नदीतील जलपर्णीवर आढळणारे कीटक हे डाससदृश्य प्रजातीचे वेगळे कीटक आहेत. त्यांच्यामुळे मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार होत नाहीत. आम्ही यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाला अहवाल दिला आहे. शिवाय जलपर्णी काढणे हा विषय आरोग्य विभागाच्या कार्यक्षेत्रात येत नाही. ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा किंवा जलसंपदा, पर्यावरण, ग्रामविकास यांच्याशी संपर्क साधून आवश्यक उपाययोजना कराव्यात.
- डॉ. महेश वाघमारे, विस्तार अधिकारी, आरोग्य विभाग, हवेली पंचायत समिती
आमच्या ग्रामपंचायतीचा आकार लहान आहे. तरही आम्ही अतिरिक्त आर्थिक भार सोसून धुरफवारणी केली आहे. डासांचा त्रास सातत्याने वाढत आहे. उन्हाळ्यात नदीकाठी वसलेल्या गावांना हा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आम्ही पंचायत समिती व आरोग्य विभागाशी संपर्क साधून याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
- पुष्पा कोतवाल, सरपंच, अष्टापूर ग्रामपंचायत.
सध्या फक्त धुरफवारणी करून ही समस्या सुटणारी नाही. आम्ही आरोग्य विभागाशी संपर्क साधून इतर उपाय शक्य आहेत का, याबाबत विचारणा केली आहे. जलपर्णी काढणे, नदीकाठ स्वच्छ करणे, जनजागृती करणे हे आवश्यक आहे.
- ह. भ. प. कुमार टिळेकर, ग्रामस्थ, टिळेकरवाडी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT