मोशी ते चाकणदरम्यानची वाहतूक कोंडी कायम; रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण  Pudhari
पुणे

Moshi Chakan Traffic: मोशी ते चाकणदरम्यानची वाहतूक कोंडी कायम; रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण

जीवघेण्या अपघातानंतरही प्रशासन हलेना

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर: पुणे-नाशिक महामार्गावर मोशी, चिंबळी फाटा, आळंदी फाटा, चाकण चौक, आंबेठाण चौक यादरम्यान दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांना अडथळा निर्माण होत असून, वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे.

आंबेठाण चौक, भाम येथील तळेगाव मार्ग, मुख्य चाकण चौक, आळंदी फाटा येथे तर अनेक जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्याची दुरुस्ती न झाल्याने वाहतुकीची समस्या कायम आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी केलेल्या चाकण दौऱ्यानंतर वाहतुकीचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा होती. परंतु, समस्या ‌‘जैसे थे‌’ आहे. (Latest Pune News)

गेल्या अनेक वर्षांपासून पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. गेल्या काही महिन्यांत ही समस्या अधिकच उग्र झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे अनेकांनी जीव गमावला आहे. चाकणच्या जनतेने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आंदोलन केले. त्यानंतर जाग आलेल्या शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले.

पालकमंत्री अजित पवार यांनी चाकणचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर देखील वाहतूक कोंडी कमी झाली नाही. किमान पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर मोशीपासून थेट आंबेठाण चौकापर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे तरी बुजविले जातील, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली.

पुणे-नाशिक महामार्गावर मोशी ते भाम प्रत्येक चौकात मोठे खड्डे पडले आहेत. याशिवाय महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांची देखील चाळण झाली आहे. पावसाचे पाणी खड्ड्यात साठल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. या खड्ड्यांत वाहने बंद पडतात. अपघातही होत आहेत. आंबेठाण चौकातील खड्ड्यांमुळे एकाला जीव देखील गमवावा लागला, तरीही प्रशासनाकडून खड्डे बुजविण्यात आले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT