

खडकवासला: जेपीनगर, नांदेड, किरकटवाडीसह सिंहगड रस्ता परिसरात तापासह विषाणूजन्य आजाराची साथ पसरली आहे. खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे, तर दुसरीकडे सरकारी आरोग्य सेवा मात्र ठप्प पडली असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे.
दमट हवामान आणि सततच्या पावसामुळे या भागातील गल्ली बोळांसह रस्ते, सार्वजनिक ठिकाणी झाडे-झुडपे, गवतामुळे दलदल वाढली आहे. त्यामुळे डास, माशांसह किटकांची पैदास होत आहे. (Latest Pune News)
नांदेड येथील दाट लोकवस्तीच्या जेपीनगर, किरकटवाडी, नांदेड फाटा, बांरागणी मळा या भागात सर्वांत गंभीर चित्र आहे. गवत, झुडपे काढण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे भाजप प्रदेश ओबीसी आघाडीचे सचिव दत्तात्रय कोल्हे यांनी सांगितले.
महापालिकेत समावेश होऊन या परिसरात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य सेवा पुरवली जात आहे. मात्र प्रचंड लोकसंख्येमुळे ही सेवा अपुरी पडत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाची सेवाही नियमितपणे नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रशासनाने रुग्ण तपासणी मोहीम राबवावी
गेल्या वर्षी पावसाळ्यात नांदेड, किरकटवाडी, खडकवासला आणि सिंहगड रस्ता परिसरात जीबीएस रोगाची साथ पसरली होती. या साथीने सहा जणांचा मृत्यू झाला. अशी गंभीर स्थिती निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी मोहीम सुरू करावी, अशी मागणी भाजप खडकवासला-नांदेड मंडलाचे अध्यक्ष रुपेश घुले यांनी केली आहे.
वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य आजार, तापाची लागण वाढली आहे. सर्दी खोकला व ताप अशी लक्षणे रुग्णांत आहेत. यात लहान मुलांची संख्या अधिक आहे. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून आरोग्याची काळजी घ्यावी.
- डॉ. आशिष पाटील, संचालक, श्रेयस हॉस्पिटल, किरकटवाडी
खडकवासला, नांदेड, किरकटवाडी परिसरात गेल्या आठ दहा दिवसांपासून तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. दररोज 50 ते 70 तापाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
- डॉ. शब्दा शिरपूरकर, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र, खडकवासला