पुणे: राज्यात पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये आत्तापर्यंत 1 लाख 25 हजार 836 शेतकर्यांनी सहभाग घेतला आहे. तर पीक विम्याखालील क्षेत्र 78 हजार 731 हेक्टरइतके आणि 422 कोटी 56 लाख रुपयांचा पीकविमा संरक्षित रक्कम असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून देण्यात आली.
गेल्या 24 तासात विमा अर्ज भरणार्या शेतकर्यांची संख्या तब्बल 61 हजार 390 इतकी आहे. पीकविमा योजनेत 5 जुलैअखेरच्या ताज्या अहवालानुसार 1563 कर्जदार शेतकर्यांचा सहभाग असून बिगर कर्जदार शेतकर्यांचे 1 लाख 24 हजार 273 शेतकरी आहेत. (Latest Pune News)
विमा योजनेतील विभागनिहाय शेतकर्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कोकण विभाग 475, नाशिक 12206, पुणे 9123, कोल्हापूर 2527, छत्रपती संभाजीनगर 35383, लातूर 47224, अमरावती 16165, नागपूर 2698.
याबाबत माहिती देताना कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिक वैभव तांबे म्हणाले,“खरीपात पीकनिहाय प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम ही प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी आहे. खरीप हंगामात शेतकर्यांनी भरावयाचा पीकविमा हप्ता हा दोन टक्के आहे.
विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के किंवा प्रत्यक्षात विमादर हा दोन टक्क्यांपेक्षा कमी असल्यास जो कमी आहे तो विमा हप्ता भरावा लागणार आहे. शेतकर्यांना योजनेतील सहभागासाठी अॅग्रिस्टॅक नोंदणी बंधनकारक असून ई-पीक पाहणी शंभर टक्के करणे आवश्यक राहणार आहे. पीकविमा योजनेत शेतकर्यांना 31 जुलैपर्यंत सहभाग घेता येणार आहे.”