प्रसाद जगताप
पुणे: राज्याची जीवनवाहिनी मानल्या जाणार्या महामार्गांपैकी एक म्हणजे पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे (यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग). या महामार्गावर वाहतूक कोंडीबरोबर येथे होणारे मोठ्या प्रमाणातील अपघात हा कळीचा मुद्दा बनला आहे.
कारण, या महामार्गावरील मागील पाच वर्षांतील अपघात आणि अपघाती मृत्यूंची संख्या, याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार दरवर्षी येथे 80 हून अधिक वाहनचालकांचे अपघाती मृत्यू होत आहेत.(Latest Pune News)
महामार्ग पोलिसांनी गेल्या पाच वर्षांतील महामार्गासंदर्भात दिलेल्या आकडेवारीनुसार, या महामार्गावर दरवर्षी सरासरी 150 ते 200 च्या घरात अपघात घडत आहेत. गंभीर जखमी होणार्या वाहनचालकांची संख्याही 100 पेक्षा अधिक आहे. यामुळे या महत्त्वाच्या मार्गावर धावणार्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हा महामार्ग मृत्यूचा मार्ग ठरताना दिसत आहे.
ही आहेत अपघाताची कारणे....
निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगाने वाहने चालवणे
सीट बेल्ट न लावणे
फलकावर लावलेल्या सूचनांचे पालन न करणे
वाहनांची वेळेत देखभाल दुरुस्ती न करणे
प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी गाडीत भरणे
एक्सप्रेसवेवर अनधिकृतरित्या पार्किंग करणे
ओव्हरटेकिंगसाठी प्रयत्न करणे
धुक्याचा अंदाज न घेता गाड्या रस्त्यावर उतरवणे
घाटात वाहने चालविणारे चालक अकुशल
पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी आमच्याकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अपघात स्थळांची माहिती देण्यासाठी जागोजागी सूचनाफलक लावण्यात आले आहेत. याशिवाय आमच्याकडून 40 कर्मचारी पुणे हद्दीत तैनात करण्यात आले आहेत. मात्र तरी काही वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करत नसल्यामुळे आणि वाहनांना येणार्या तांत्रिक समस्यांमुळे अपघात होत असल्याचे आमच्या अनेकदा निदर्शनास आले आहे. वाहन चालकांनी अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि वाहनाची वेळेत देखभाल दुरुस्ती करावी.- विक्रांत देशमुख, महामार्ग पोलिस अधीक्षक, पुणे विभाग
पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरून प्रवास करणे म्हणजे आता एक मोठी जोखीम वाटते. मी कायम या रस्त्याने प्रवास करतो. वेगाने वाहन चालवणे, अचानक लेन बदलणे आणि नियमांचे उल्लंघन करणे हे सर्रास चालते. रात्रीच्या वेळी तर अनेक वाहनचालक दारू पिऊन गाडी चालवतात. कधी-कधी तर मला भीती वाटते की, मी सुखरूप घरी पोहचणार की नाही. प्रशासनाने फक्त आकडेवारी जमा न करता, प्रत्यक्ष कठोर उपाययोजना कराव्यात. सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेग तपासणार्या यंत्रणांचा वापर वाढवावा आणि नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करावी.- बाप्पू खाडे, वाहनचालक