महायुतीच्या 175 पेक्षा जास्त जागा येतील; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास  Pudhari File Photo
पुणे

Pune Elections: महायुतीच्या 175 पेक्षा जास्त जागा येतील; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

Ajit Pawar News: मला पूर्ण विश्वास आहे की बारामतीकर यंदा मला चांगल्या मतांनी निवडून देतील

पुढारी वृत्तसेवा

Political News: महायुतीचे 175 पेक्षा जास्त उमेदवार निवडून आणणे हाच फॉर्मुला ठरवला असून त्यानंतरच सर्वांना बरोबर घेऊन बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत निर्णय होईल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

काटेवाडी (ता. बारामती) येथे बुधवारी (दि. 20) सकाळी 7 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार आणि पुत्र जय पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीचा मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

विनोद तावडे यांच्या व्हिडीओवर बोलताना पवार म्हणाले, तो व्हिडीओ नेमका मंगळवारी आलेला आहे. त्यामध्ये पैशाचा विषय चाललेला आहे. हा निवडणुकीच्या आचारसंहितेचा एक प्रकारे भंग आहे. पुढे चौकशी झाल्यानंतर ’दूध का दूध व पाणी का पाणी’ होईल. तो निवडणूक आयोगाचा भाग असून त्याची चौकशी सुरू आहे. त्यामध्ये ज्यांची नावे आहेत ते सत्य लवकरच लोकांसमोर येईल.

निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी शरयू टोयाटोची तपासणी केली याबाबत बोलताना पवार म्हणाले, निवडणूक आयोगाला तपासणी करण्याचा अधिकार आहे. बारामतीमध्ये माझे कार्यकर्ते ज्या ठिकाणी बसतात त्या नटराज नाट्यकला मंदिर येथेदेखील निवडणूक आयोगाच्या वतीने तपासणी करण्यात आली होती. त्याबाबत कुठेही वाच्यता झाली नाही.

माझ्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती. आम्ही कुठेही तक्रारी केल्या नाहीत. भवानीनगरला दोन वेळा माझ्या बॅगांची व चॉपरची तपासणी केली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या, त्यामध्ये कोणीही अकांडतांडव केला नाही.

बारामती संवेदनशील असल्याचा दावा योगेंद्र पवार यांनी केला होता, यावर अजित पवार म्हणाले, मी मतदान करतो, बाहेर येतो मात्र कुठेही संवेदनशील वातावरण वाटत नाही. तुम्हाला कळतं ना कोण योग्य मागणी करतो व कोण पोरकटपणाची मागणी करतो. बारामतीचे मतदार हे उमेदवार जाहीर झाल्यानंतर मतदान निश्चित करतात. ते मलाच निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिला त्यांची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडतात

हेलिकॉप्टरला महिला पायलट आहे म्हटल्यावर मी म्हटलं आपण सेफ आहे. महिला त्यांची जबाबदारी उत्तमपणे पार पाडतात. निवडणुकीच्या प्रचारामुळे दुपारचे जेवण हेलिकॉप्टरमध्येच करावे लागत होते. निवडणुकीत जेवढे कष्ट घेता येतील तेवढे कष्ट सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घेतले आहेत.

बारामतीतून मोठ्या मताधिक्याने विजय

लोकसभेप्रमाणे विधानसभेलादेखील आमची घरातीलच उमेदवारांमध्ये लढत आहे. मात्र, मला पूर्ण विश्वास आहे की बारामतीकर यंदा मला चांगल्या मतांनी निवडून देतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. बारामतीमध्ये भावनिक राजकारण होते काय, या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मी कधी भावनिक राजकारण केले ? तुम्ही माझ्या सांगता सभेतील भाषण पाहिले असेल या वेळी मी फक्त पाच वर्षांमध्ये काय केले व पुढील पाच वर्षांत काय करणार आहे याचा लेखाजोखा मांडला.

मला विश्वास आहे की, बारामतीकर यंदादेखील मला मोठ्या मताधिक्याने निवडून देतील. ही निवडणूक आपल्याला अवघड वाटत होती का, यावर अजित पवार म्हणाले, अजिबात नाही. मला ही निवडणूक विकासावर न्यायची होती. कोणावरही टीकाटिप्पणी न करता मलाही निवडणूक लढवायची होती, असे पवार या वेळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT