

Pune Voting Update: पुणे जिल्ह्यातील एकवीस मतदारसंघांत पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला. पुणे जिल्ह्यात मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला असून, पाच वाजेपर्यंत तब्बल 54.09 टक्के मतदान झाले आहे.
2019 ला 60 टक्के मतदान झाले होते. याचा विचार करता या वेळी मतदारांच्या उत्साहामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. ग्रामीण भागात मतदारराजाने सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावल्या असल्याचे पाहायला मिळाले. प्रामुख्याने सर्वाधिक मतदान इंदापूरमध्ये, तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात कमी झाले आहे. पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.9 टक्के मतदान झाले.
विशेषत: पुणे शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदारांमध्ये अधिक उत्साह दिसून आला. जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील 11 मतदारसंघ शहरी भागात, तर 10 मतदारसंघ ग्रामीण भागात येतात. सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक 64.50 टक्के मतदान इंदापूर विधासभा मतदारसंघात झाले. त्याखालोखाल मावळ मतदारसंघात 64.44 टक्के मतदान झाले, तर सर्वात कमी 42.72 टक्के मतदान पिंपरी मतदारसंघात झाले. बुधवारी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील 100 मतदान केंद्रांवर रांगा लागल्या असल्याचे चित्र होते.
जिल्ह्यात सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. पाहिल्या दोन तासांत शहरासह ग्रामीण भागात अतिशय धीम्या गतीने मतदान झाले. दुपारी 11 नंतर शहरी भागातील मतदान केंद्र ओस पडली असताना ग्रामीण भागात मतदानाचा वेग वाढला होता. सायंकाळी 5 पर्यंत ग्रामीण भागातील शिरूर आणि पुरंदर मतदारसंघ वगळता इतर मतदारसंघांत 60 टक्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते.
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांतील सकाळी सात ते सायंकाळी 5 पर्यंतचे मतदान तब्बल 54.9 टक्के मतदान झाले होते. प्रामुख्याने वडगाव शेरी 50.46 टक्के, पुणे कॅन्टोन्मेंट 47.83 टक्के, पर्वती 48.65 टक्के, कोथरूड 47.42 टक्के, खडकवासला 51.56 टक्के, कसबा 54.91 टक्के, हडपसर 45.02 टक्के मतदान झाले. अनेक विधानसभा मतदारसंघांत चुरशीची लढती असल्याने सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा पाहायला मिळाल्या.
वाढलेल्या टक्क्याचा धक्का कोणाला?
पुणे जिल्ह्यातील सर्वच विधानसभेच्या मतदारसंघांत मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत टक्का वाढला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे वाढलेला टक्का महायुतीच्या उमेदवारांना की महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फायदेशीर ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंदापूरसह, बारामती, खडकवासला मतदारसंघांत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे हा वाढलेला टक्का कोणाची डोकेदुखी ठरणार आणि कोणाला फायदेशीर ठरणार, हा विषयी महत्त्वाचा ठरणार आहे.