पुणे

एकीकृत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी यंत्र अभियांत्रिकीला वाढती मागणी

अमृता चौगुले

गणेश खळदकर

पुणे : मेट्रोपर्यंत पोहोचण्यासाठी एकीकृत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज आहे. त्यामुळे वेगवेगळ्या वाहनांची मागणी वाढत असून, वाहतूक व्यवस्था आणि वाहन निर्मितीमध्ये यंत्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची मागणी वाढणार आहे. यातूनच त्यांना नवउद्योजक होण्याची संधी निर्माण झाली असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

पुणेकर सध्या कुतूहलापोटी मेट्रोची स्वारी करीत असले तरी, मेट्रोच्या यशस्वितेसाठी एकीकृत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे. यात सार्वजनिक बस व्यवस्था, ई-रिक्षा, ई-टॅक्सी, ई-सायकल इत्यादींचा समावेश आहे. जेणेकरून नागरिकांना घराच्या जवळून मेट्रो स्टेशनपर्यंत आणि मेट्रोच्या प्रवासानंतर गंतव्यस्थळी पोहोचण्यासाठी सुविधा उपलब्ध असेल.

ई-वाहनांची निर्मिती व्हावी

एकीकृत व्यवस्थेतून प्रवाशांना सहजपणे योग्य वेळेत, रास्त दरात आरामदायक प्रवास करता यायला हवा. नाहीतर मेट्रोच्या स्टेशनखाली दुचाकींची गर्दी होईल आणि खालच्या रस्त्यांचा श्वास गुदमरायला लागेल. त्यामुळे यंत्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी नवउद्योजक होऊन वेगळ्या नावीन्यपूर्ण अशा ई-वाहनांची निर्मिती करावी. यातून प्रदूषणाला आळा बसेल, पेट्रोलची आवश्यकता संपून जाईल, तर बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि हवा आणि ध्वनी प्रदूषणातून नागरिकांची सुटका होईल, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

एकीकृत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे फायदे

  • सामुदायिक आरोग्याचे बळकटीकरण
  • समाजाचा आर्थिक फायदा
  • नवनीकरण ऊर्जेच्या स्रोतांवर चालणार्‍या वाहनांचा उपयोग
  • सामुदायिक गतीशीलतेत सुलभता, रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी

विद्यार्थ्यांना काय आहेत संधी

  • नावीन्यपूर्ण ई-वाहनांची निर्मिती करणे
  • वाहनांचे आकर्षक डिझाईन बनविणे, पर्यावरणपूरक वाहनांसाठी संशोधन
  • संकरित वाहने आणि विद्युत वाहनांचे स्टार्टअप
  • वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी संशोधन
पुण्यात काय करता येईल
  • जवळपासच्या मेट्रो स्टेशनपर्यंत विद्युत प्रभारित वाहनांचा वापर
  • मेट्रो आणि पीएमपीएमएल यांच्या संयुक्त माध्यमातून एकाच तिकिटावर प्रवास
  • मेट्रो आणि पीएमपीएमएल यांच्या वेळांचे सुसूत्रीकरण
  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यासाठी लोकांचे प्रबोधन

मेट्रोपूरक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करताना विद्युतभारित गो-कार्ट प्रकारातील चार किंवा सहा आसनी वाहनांचा विचार करून तशी वाहने बनविण्यात यंत्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. जेणेकरून हवा अणि ध्वनी प्रदूषण कमी करता येईल. यातून बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल अणि अशा प्रकारच्या वाहननिर्मितीला चालना मिळेल.
– प्रा. डॉ. गणेश काकांडीकर, संकुल प्रमुख, यंत्र अभियांत्रिकी, एमआयटी

वैयक्तिक वाहन वापर कमी करण्यासाठी अणि मेट्रो स्टेशनवर वाहनतळ उपलब्ध नसल्याने अ‍ॅप आधारित टॅक्सीसेवा विकसित करण्यावर भर द्यावा, यात विद्युत सायकलीचा वापर हादेखील उत्तम पर्याय होऊ शकतो.
    – डॉ. कमल व्होरा, माजी वरिष्ठ उप-संचालक,ऑटोमोटिव्ह असोसिएशन ऑफ इंडिया,

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT