नीलेश बनकर
शिर्सुफळ: दुर्मिळ आणि वेगवान शिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मॉण्टेग्यू हॅरिअर (निळसर भोवत्या) या स्थलांतरित पक्ष्यांचे शिर्सुफळ, पारवडी व गाडीखेल परिसरात आगमन झाले आहे. युरोप, पश्चिम आशिया आणि सायबेरिया येथून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी नोव्हेंबरच्या उत्तरार्धात बारामती परिसरात दाखल झाले आहेत.
दरवर्षीप्रमाणे मॉण्टेग्यू हे पक्षी साधारण 15 फेबुवारीपर्यंत बारामती, सासवड, सोलापूर, इंदापूर, अहिल्यानगर या परिसरात मुक्कामी असतात. स्थानिक पक्षीनिरीक्षकांच्या मते मॉण्टेग्यू हा अतिशय चपळ व वेगवान शिकारी असून त्याचे आगमन हे परिसरातील पर्यावरणीय संतुलनाचे आणि अधिवासाच्या आरोग्याचे सकारात्मक संकेत मानले जातात.
मॉण्टेग्यू हॅरिअरची वैशिष्ट्ये
घारीपेक्षा आकाराने लहान असणाऱ्या या पक्ष्यांचा मुख्य अधिवास युरोप व आशियातील गवताळ प्रदेश, शेती परिसर, ओसाड मैदान, नदीकाठी आढळतो. त्याच्या अन्नामध्ये छोटे कीटक, किडे, अंडी, उंदीर आणि काही सरपटणारे प्राणी यांचा समावेश असतो. प्रजनन काळात नर आणि मादी पंख फडफडविणे व विशिष्ट आवाज काढणे अशा पद्धतीने संवाद साधतात. मार्च ते मे या कालावधीत मादी 5 ते 8 अंडी घालते आणि पिल्लांची काळजी दोघेही मिळून घेतात. मॉण्टेग्यू हॅरिअरमध्ये जनुकीय विविधता असल्याने त्याच्या अनेक उपप्रजाती आढळून येतात. खोकड व कोल्हा यांच्याकडून त्यांना काही प्रमाणात धोका असतो. रात्री मोठ्या संख्येने हे पक्षी एकत्र येऊन जमिनीवर विसावतात आणि प्रजनन काळात घरटेसुद्धा दोघे मिळून बांधतात.
पक्षिप्रेमी, छायाचित्रकार, पर्यावरण अभ्यासकांमध्ये उत्सुकता
स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनामुळे पक्षीप्रेमी, छायाचित्रकार आणि पर्यावरण अभ्यासकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. बारामती परिसरातील नैसर्गिक पर्यटनालाही चालना मिळत असून, मॉण्टेग्यू हॅरिअरचे नियमित आगमन हे परिसराच्या जैवविविधतेत लक्षणीय भर घालत आहे, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे यांनी दिली, तर गाडीखेल, शिर्सुफळ व पारवडी परिसरात या पक्ष्यांचे आगमन होत असल्याने प्रदेशातील जैवविविधता वाढत आहे. ’पक्षीप्रेमींनी या परिसराला भेट देऊन निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्यावा,’ असे आवाहन गाडीखेलचे सरपंच बाळासाहेब आटोळे यांनी केले.
दृष्टिक्षेपात
इंग््राजी नाव : मॉण्टेग्यू हॅरिअर
मराठी नाव : निळसर भोवत्या
वैज्ञानिक नाव : सर्कस पायगार्गस
आकार : लांबी 43 ते 47 सेंमी, पंखांचा विस्तार 100 ते 115 सेंमी
वजन : नर 265 ग््रॉम, मादी 380 ग््रॉम
पक्षीनिरीक्षण करताना या पक्ष्यांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये, त्यांच्या नैसर्गिक अधिवासात अनावश्यक हस्तक्षेप टाळावा आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वर्तन करावे.संतोष उंडे, वनपाल, बारामती वन विभाग