पुणे: शहराच्या विकासाची भाषा करणार्या भाजप नेत्यांना त्यांच्याच पक्षाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी घरचा आहेर दिला आहे, अशी टीका माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.
गेल्या दहा वर्षांत शहराचा काहीच विकास झाला नसल्याची कबुुली खासदार कुलकर्णी यांनी दिली असून त्यामुळे पुण्यात राहावेसे वाटत नाही, असेही मत व्यक्त केले आहे. शहराचा विकास खुंटल्याने पुणे नकोसे झाले, असे वक्तव्य करून त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. (Latest Pune News)
त्यामुळे भाजपच्या दिशाहीन आणि निष्क्रिय कारभारावर विरोधी पक्षांनी टीका करायची आता गरज उरलेली नाही, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्मार्ट सिटी योजना पुण्यासह देशभर फसली आहे. मुठा नदी सुधार नदी योजनेची काहीच प्रगती झालेली नाही, असे भाजपचे नेतेच बोलत असतात. रस्ते, स्वच्छता आदी नागरी सुविधा कोलमडलेल्या आहेत, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.