

पुणे: पुणेकरांचे जीवन बिकट झाले, या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवा मंत्री यांनी आभार व्यक्त करीत त्यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. पुणे शहरामध्ये भाजपचे आमदार, खासदार आहेत. तर गेली अनेक वर्ष महापालिकेमध्ये देखील भारतीय जनता पक्षाची सत्ता होती.
आत्ताचे पुण्याचे खासदार केंद्रामध्ये राज्यमंत्री आहेत, आमदार महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत, तेही भाजपचे. तरीही पुणेकरांचे जीवन बिकट झाले आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, सत्ताधार्यांनी शहराकडे लक्ष दिलेले नाही, हे वास्तव आपण मान्य केलेत त्याबद्दल मी आपला आभारी आहे, असे मंत्री यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे. (Latest Pune News)
शहरातील पायाभूत सुविधा, कचर्याचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. पर्यावरणाचा र्हास करून नदी सुधारणा नको असे पुणेकरांचे देखील मत होते व आहे. आपण उशिरा का होईना हा प्रश्न हाती घेतला आहे त्याबद्दल पुणेकर नागरिकांतर्फे आपणास विशेष धन्यवाद.
भविष्यकाळातही आपण या भूमिकेवर ठाम राहाल, अशी आशा आहे. आपण पुढे येऊन हिम्मत दाखवून आपली भूमिका स्पष्ट केली याबद्दल आपले मनःपूर्वक आभार, असेही मंत्री यांनी या पत्रात म्हटले आहे.