पुणे

मोदींनी 300 लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशेब द्यावा : माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटीलांची मागणी

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या दहा वर्षांत देशाची सत्ता चालवताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या प्रमाणात घोटाळे केले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत झालेल्या तीनही टप्प्यांतील मतदानातून मोदी सरकार जाणार, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, 'झोला लेके निकलूँगा' असे म्हणणार्‍या मोदींनी जाण्यापूर्वी 300 लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशेब द्यावा, अशी मागणी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केली. पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कोळसे पाटील बोलत होते.

ते म्हणाले, मोदी-शहांना प्रत्येक संस्थेवर ताबा मिळवायचा असल्याने निवडणूक आयोग, न्यायमूर्ती यांच्या नियुक्तींची प्रक्रिया बदलली. निवडणूक रोख्यांचा जगात सर्वांत मोठा घोटाळा असल्याचे निर्मला सीतारामन यांचे पती म्हणत आहेत. मोदींसारखा खोटे बोलणारा नेता यापूर्वी कधी देशाने पाहिला नाही. मूलभूत हक्काची पायमल्ली होत असेल तर न्यायालय स्वत:हून अ‍ॅक्शन घेते. मात्र, देशात मूलभूत हक्काची पायमल्ली होत असताना गेल्या दहा वर्षांत एकदाही सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो अ‍ॅक्शन घेतली नाही. कायद्याचे दात काढण्याचे काम मोदी-शहांनी केल्याचेही कोळसे पाटील म्हणाले.

….म्हणून पानसरे यांची हत्या

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर याबाबतची माहिती नागरिकांना देण्यासाठी मी, एम. एन. मुश्रीफ आणि कॉ. गोविंद पानसरे आम्ही राज्यात 'हू इज करकरे' याअंतर्गत सभा घेणार होतो. दोन सभा झाल्यानंतर पानसरे यांची हत्या झाली. ही हत्या मुंबई हल्ल्यासंदर्भात खरी माहिती लोकांसमोर येऊ नये म्हणून करण्यात आली. त्यानंतर त्याला शिवाजी कोण होता? या पुस्तकामुळे झाल्याची चर्चा घडविण्यात आली. मुंबई हल्ल्यासंदर्भात आयबीने माहिती दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची विचारसरणी हिंदुत्ववादी होती, ते पूर्वीपासूनच आरएसएसशी निगडित होते. त्यामुळे त्यांनी सरकारी वकील म्हणून योग्यप्रकारे काम केले नाही, असेही कोळसे पाटील म्हणाले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT