पुणे

मोदी हे खोटारड्या लोकांचे सरदार : मल्लिकार्जुन खर्गे

Laxman Dhenge

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : मोदी हे खोटारड्या लोकांचे सरदार आहेत. त्यामुळे देश रसातळाला चालला असून संविधान संपले आहे, देशात लोकशाही राहिलेली नाही, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. लोणावळा शहरात सुरू असलेल्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या दोनदिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरात उपस्थितांना ऑनलाइन मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आज सर्व ठिकाणी मोदींच्या गॅरंटीबाबत बोलले जाते; परंतु 2014 मध्ये सत्तेत येताना मोदी यांनी दोन कोटी नोकर्‍या निर्माण करण्याचा शब्द दिला होता, ती गॅरंटी कुठे गेली, शेतकर्‍यांना त्यांचे उत्पन्न दुप्पट करून देण्याची घोषणा केली होती, ती गॅरंटी कुठे गेली, मोदी वारंवार खोटे बोलत आहेत. देशात बेरोजगारी वाढत आहे. तरीसुद्धा मोदींची प्रशंसा करणारे आणि त्यांना साथ देणारे लोक आहेत. त्यामुळे देशाची अवस्था बिकट होत चालल्याचा घणाघात त्यांनी केला.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद गटनेते सतेज पाटील, आमदार संजय जगताप, प्रणिती शिंदे, माणिकराव ठाकरे यांच्यासह आजी-माजी आमदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना आपणा सर्वांनी एकजूट होऊन पुढे जाणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन खर्गे यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यात पारदर्शकता नव्हती. त्यामुळे हा निर्णय आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.

याद्वारे भाजपला खासगी कार्पोरेट कंपन्यांकडून खूप पैसा मिळाला आणि त्याबदल्यात त्यांनी त्यांना हवे तसे कायदे करून घेतले, अशी टीकाही त्यांनी केली. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, सरकारच्या कार्यवाहीत स्पष्टतेची गरज असल्याचे पटोले यांनी सांगितले. तसेच, मागासवर्ग आयोगाचा अहवाल वेबसाइटवर टाका आणि 24 तासांच्या आता अध्यादेश काढा, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. यावेळी आमदार अमित देशमुख यांना भाजप प्रवेशाबद्दल विचारले असता त्यांनी या सगळ्या अफवा असल्याचे स्पष्ट केले. जरांगेंचे आंदोलन सुरू असल्याने मराठा आरक्षणावर सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

'कहूँ तो माँ मारी जाए, न कहूँ तो बाप कुत्ता खाए'

पक्ष सोडून जात असलेल्या नेत्यांबद्दल बोलताना खर्गे म्हणाले, की सध्या सर्व अवघड झाले असून 'कहूँ तो माँ मारी जाए, न कहूँ तो बाप कुत्ता खाए' या म्हणीप्रमाणे अवस्था आहे. ज्याला सर्व काही दिले ते घर सोडून जात आहेत; परंतु आपण समोर बसलेले सर्वजण पक्षाशी, जमिनीशी जोडलेले नेते आहेत आणि त्यांच्याच बळावर पक्ष पुढे जाणार आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT